
जम्मू कश्मीरमध्ये कश्मिरी पंडितांची सुरक्षा गंभीर मुद्दा बनत आहे. कश्मीर खोऱ्यात सरकारी सेवेत असलेले कश्मिरी पंडित जम्मू, श्रीनगरसारख्या सुरक्षित ठिकाणी बदली देण्याची मागणी करत आहेत. तसेच टार्गेट किलिंगविरोधात आंदोलनही करण्यात येत आहे. कश्मीर खोऱ्यातील परिस्थिती बिकट असून पुन्हा 1990 सारखी स्थिती अनुभवण्याची इच्छा नसल्याचे कश्मिरी पंडितांनी सांगितले. तसेच खोऱ्यात होणाऱ्या टार्गेट किलिंगच्या पार्श्वभूमीवर खोऱ्यातील सुरक्षा वाढवण्यावर सरकारने भर दिला आहे.
कश्मीर खोऱ्यात सुरू असलेल्या टार्गेट किलिंगच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाची महत्त्वाची बैठक झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीत अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. त्यांनी कश्मीर खोऱ्यातील कश्मिरी पंडितांच्या सुरठक्षेवर भर देत कश्मिरी पंडितासाठी खोऱ्यात सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, दहशतवाद्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे कश्मिरी पंडित आणि तेथील प्रवासी मजूरांचा विश्वास मिळवणे सरकारसमोर मोठे आव्हान आहे.
कश्मिरी पंडित खोऱ्याबाहेर बदलीची मागणी करत आहेत. मात्र, जम्मू-कश्मीर प्रशासन या मागण्यांकडे लक्ष देत नाही. कर्मचाऱ्यांना कश्मीर खोऱ्यातच सुरक्षित ठिकाणी बदली देण्यात येईल. मात्र, खोऱ्याबाहेर त्यांची बदली होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. खोऱ्यात विविध ठिकाणी तैनात असलेल्या 177 कश्मिरी पंडितांना जिल्हा मुख्यालयात बदली देण्यात आली आहे.
सध्याच्या कश्मीर खोऱ्यातील परिस्थितीत अमरनाथ यात्रा सुरक्षितपणे पार पाडण्याचे आव्हान सरकारसमोर आहे. 30 जूनपासून सुरू होणारी ही यात्रा 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या काळात बराच काळ यात्रेकरूंचा प्रवास कश्मीर खोऱ्यातूनच होते. मात्र, भाविकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेत ठरलेल्या वेळेनुसार आणि ठरलेल्या मार्गानेच ही यात्रा होणार आहे. यात्रेत कोणताही बदल होणार नाही, असे गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.



























































