कलातपस्वीला वंदन, ‘पुरु अर्पण’मधून कथ्थक ऋषी डॉ. पुरू दधीच यांना मानवंदना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कथ्थक ऋषी म्हणून ओळखले जाणारे डॉ. पुरू दधीच, त्यांच्या पत्नी नृत्यगुरू डॉ. विभा दधीच यांना मानवंदना देण्यासाठी नृत्यस्मृती आणि नटरवी यांनी ‘पुरु अर्पण’ या कार्यक्रमाचे आयोजन केले. विलेपार्ले येथील कला वैभव सभागृहात शुक्रवारी हा कार्यक्रम झाला.

‘पुरु अर्पण’ कार्यक्रमात डॉ. पुरू दधीच यांच्या प्रसिद्ध रचना सादर झाल्या. यामध्ये दमयंती भाटिया मिरडवाल यांच्या ‘काली स्तवन’ आणि डॉ. पीयूष राज आणि सुनील सुंकारा यांच्या ‘पार्वती परिणय’ या गाण्यांचा समावेश होता.

नृत्यांगना स्मृती तळपदे आणि त्यांच्या शिष्यांनी नांदी, ताल बसंत आणि भैरवी अभंग सादर केला. चेन्नई येथील नेहा बॅनर्जी यांनी ‘शंकर पार्वती नर्तन’, तर रिद्धी मिश्रा यांनी ‘मधुराष्टकम’ने रसिकांना थक्क केलं.

शीतल तळपदे यांच्या रंगवेद संस्थेतर्फे देशातील अज्ञात वीरांगनांना नाटय़रूपात आदरांजली वाहण्यात आली. प्रतिमा कंटक, हिमांगी शुक्ल, सुनीता रामटेके आणि संध्या ओक यांनी हा कलाविष्कार सादर केला. ओडिसी नर्तिका मिताली वराडकर आणि श्रेया सभरवाल यांच्या ‘त्रिपुरेश्वरी पल्लवी’ नृत्याने अद्वितीय नृत्य सादर झालं. या कार्यक्रमात दधीच दांपत्याचा वारसा पुढे चालवणारी हर्षिता शर्मा दधीच उपस्थित होत्या.

पंडित कालिनाथ मिश्रा, ओडिसी नृत्यांगना शुभदा वराडकर, कथक निपुण रेणू शर्मा, रचनाकार कौशिक बासू, गायिका शर्मिष्ठा बासू, त्याचप्रमाणे बंगलोरची संगीतकार जोडी कार्तिक रमण आणि अरिंदम गोस्वामी, अभिनेत्री श्वेता पेंडसे, टीना भाटिया आणि अभिनेते बोलाराम दास यावेळी उपस्थित होते.

नृत्य परंपरेचे पुनरुज्जीवन

कथ्थक नृत्य परंपरेचे पुनरुज्जीवन आणि जतन करण्यामध्ये दधीच दांपत्याने मोलाची भूमिका बजावली आहे. ते नटवरी कथ्थक गुरुकुलचे नेतृत्व करतात. गुरुशिष्य परंपरेला खूप महत्त्व देतात कथ्थक नृत्यातील प्रगत संशोधनासाठी श्री श्री सेंटर ऑफ ऍडवांस्ड रिसर्चचे नेतृत्व त्यांच्याकडे आहे. शास्त्र आणि साहित्याच्या सखोल ज्ञानातून डॉ. पुरू दधीच यांनी अनेक नृत्यनिर्मिती केल्या आहेत. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाने डॉ. विभा दधीच यांना महामहोपाध्याय ही मानाची पदवी घोषित केली आहे.