
कात्रजमधील टेल्को कॉलनीत एमएनजीएलच्या पाईपलाईनला मंगळवारी (दि. 6) भीषण आग लागली होती. मात्र, अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.
आज सकाळी साडे अकराच्या सुमारास एमएनजीएलच्या गॅस पाईपलाईनला आग लागली. त्यानंतर नागरिकांनी त्वरित अग्निशामक दलाशी संपर्क साधला. त्यानुसार वर्दी मिळताच तीन मिनिटात अग्निशमक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. फोमचा वापर करत पथकाने दहा मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले.
‘पाईपलाईनला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमनच्या तीन गाड्या बोलावण्यात आल्या होत्या. तब्बल अध्र्या तासाच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे विझविण्यात यश आले. आग नेमकी कशामुळे लागली याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. अशी माहिती अग्निशमन अधिकारी सुभाष जाधव यांनी दिली.
शहरात गेल्या महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने आगीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. शिवाजी मार्केट, फॅशन स्ट्रीटपाठोपाठ धायरीतील कारखान्यात आगीच्या घटना घडल्या. त्याचबरोबर दररोज किमान एका आगीची वर्दी सध्या अग्निशामक दलाला मिळते आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन अग्निशमक दलाने केले आहे.



























































