पूर्ववैमनस्यातून माजी उपसरपंचावर कुऱ्हाडीने वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कवठे येमाई

शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे पूर्ववैमनस्यातून सहा जणांनी उपसरपंचावर कुऱ्हाडीने वार केल्याची भयंकर घटना घडली आहे. संतोष पांडुरंग मेचे (40) असे त्यांचे नाव असून ते यात गंभीर जखमी झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी शेतावरून मेचे यांचा नाथू पोकळे या इसमाबरोबर वाद झाला होता. त्याचा सूड उगवण्यासाठी पोकळे व अन्य सहा जणांनी मेचे यांचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानंतर शुक्रवारी मेचे शेतात एकटेच असल्याचे बघून नाथू पोकळे याने व दिलीप काशिनाथ पोकळे यांच्यासह अन्य सहाजणांनी दुपारी अडीचच्या सुमारास मेचे यांच्या डोक्यावर कु-हाडीने वार केले. यावेळी हौसाबाई नाथू पोकळे,काशिनाथ नाथू पोकळे,नवनाथ काशिनाथ पोकळे व संगीता पोकळे यांनी मेचे यांना काठी व दगडाने मारहाण केली व तिथून पळून गेले.त्यानंतर गंभीर जखमी झालेले मेचे गावाकडे पळत असताना पाटाच्या चारीत पडले . हे कळताच त्यांचे वडील पांडुरंग मेचे व एकनाथ बबन पोकळे यांनी तातडीने त्यांना गावातील दवाखान्यात नेऊन प्राथमिक उपचार करीत शिरूरला सरकारी दवाखान्यात हलविले. डोक्यावर गंभीर मार लागल्याने त्यांना तातडीने पुण्याच्या ससून रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांना टाके घालण्यात आले आहेत. या प्रकरणी संतोष मेचे यांनी पोलिसांत रीतसर फिर्याद दिली असून शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पी एस आय किरण घोंगडे यांनी दिली.

तर संतोष मेचे व इतर दोघांनी घरात घुसून हौसाबाई नाथू पोकळे यांना धक्काबुक्की,शिवीगाळ व नातू विठ्ठल काशिनाथ पोकळे यास मारहाण केल्या प्रकरणी नाथू धर्मा पोकळे रा.सविंदणे  यांनी दिलेल्या फिर्यादीं नुसार संतोष मेचे व इतर दोघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिरूरचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी दिली. पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.