
मुंबईकर गिर्यारोहक कविता चंद यांनी अंटार्क्टिकातील सर्वोच्च शिखर माऊंट विन्सन सर केले. शिखर सर करताच कविता यांनी दोन्ही हातांनी तिरंगा ध्वज मोठय़ा दिमाखात फडकवला. कविता चंद या मूळच्या उत्तराखंड राज्यातील अल्मोडा येथील रहिवासी आहेत, परंतु त्या सध्या मुंबईत राहतात. अंटार्क्टिकातील सर्वोच्च शिखर सर करून कविता यांनी हिंदुस्थानचे नाव उज्ज्वल केले आहे. महिला या पुरुषांपेक्षा कमी नाहीत हेही कविता यांनी दाखवून दिले आहे.
अंटार्क्टिकातील सर्वात उंच शिखर माऊंट विन्सन हे 4 हजार 892 मीटर उंच आहे. कविता यांच्या या यशामुळे त्यांनी महत्त्वांकाक्षी सेव्हन समिट्सच्या लक्ष्याच्या दिशेने एक पाऊल आणखी पुढे टाकले आहे. या लक्ष्यांतर्गत जगातील सात महाद्वीपांतील सर्वात उंच शिखर सर केले जाते. याआधी कविता यांनी युरोपातील शिखर माऊंट एल्ब्रस सर केले होते. जगातील सर्वात कठीण शिखरांपैकी एक असलेले माऊंट एव्हरेस्टवर प्रचंड थंडी, वेगाने वाहणारे वारे, मोठा एकांतवास आणि अंटार्क्टिकामधील हवामान हे गिर्यारोहकांची चांगलीच परीक्षा घेत असते. कविता यांची ही मोहीम 3 डिसेंबरला सुरू झाली. 4 डिसेंबरला त्या चिलीच्या पुंटा एरेनासला पोहोचल्या, 7 डिसेंबरला युनियन ग्लेशियरसाठी रवाना झाल्या. यानंतर जवळपास 2 हजार 100 मीटर उंचीवर असलेल्या विन्सन बेस पॅम्पला पोहोचल्या. युनियन ग्लेशियर ते बेस पॅम्पपर्यंतचा प्रवास स्की-सुसज्ज छोटय़ा विमानाने पूर्ण केला. या मोहिमेचे नेतृत्व प्रसिद्ध एल्टीटयुड गाइड मिंग्मा डेविड शेरपा यांनी केले.
माऊंट विन्सनवर तिरंगा ध्वज डौलाने फडकवणे हे माझ्यासाठी गर्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे. हे शिखर सर केल्याने दैनंदिन कामकाज करणाऱया महिला आणि नोकरदारांना विश्वास देतो की, फिटनेस, अनुशासन आणि मोठे स्वप्न पाहिल्यास त्याला पूर्ण केले जाऊ शकते. गिर्यारोहक असलेल्या कविता या मॅरोथॉन धावपटू आहेत. कविता यांनी याआधी एबाट वर्ल्ड मॅरोथॉन मेजर्स सिक्स स्टार चॅलेंजच्या सहापैकी तीन मॅरोथॉन पूर्ण केल्या आहेत.




























































