
चर्चगेट येथील के. सी. महाविद्यालयाच्या हलगर्जीमुळे मानसशास्त्र (सायकॉलॉजी) विषयाच्या तृतीय वर्ष, सहाव्या सत्राचे निकाल रखडले आहेत. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या पाचव्या सत्राचे गुण तसेच आवश्यक कागदपत्रे विद्यापीठाला पाठवले नसल्याने हा प्रकार घडला असून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी युवा सेनेने मुंबई विद्यापीठाला केली आहे.
के. सी. महाविद्यालय हे मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे. सायकॉलॉजीचे निकाल रखडल्याने विद्यार्थ्यांनी युवा सेनेकडे तक्रारी केल्या होत्या. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार युवा सेनेचे विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी यासंदर्भात कुलगुरू सुहास पेडणेकर यांना निवेदन दिले. निकाल जाहीर न झाल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश होऊ शकत नसल्याचे त्यांनी विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

































































