नमो नमो करत शिंदे गट भाजपच्या वाटेवर; सेंट्रल पार्कला धर्मवीर आनंद दिघेचे नाव का नाही? केदार दिघे यांचे फटकारे

आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक आहोत अशी बतावणी करणाऱ्या मिंध्यांनी स्वतःला नमो सैनिक म्हणून जाहीर केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनीही ठाण्याच्या ग्रॅण्ड सेंट्रल पार्कला मोदींचे नाव दिले आहे. नमो नमो करत हा शिंदे गट भाजपच्या वाटेवर चालला आहे असे जबरदस्त फटकारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी लगावले. राजकारणासाठी धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव वापरता, मग सेंट्रल पार्कला धर्मवीरांचे नाव का दिले नाही, असा सवालही त्यांनी केला.

ठाण्यातील ग्रॅण्ड सेंट्रल पार्क हा प्रकल्प ठाणे महापालिकेच्या पैशांतून साकारला आहे. या प्रकल्पाला एकनाथ शिंदे यांनी मोदींचे नाव दिले आहे. हा प्रकल्प आता ‘नमो ग्रॅण्ड सेंट्रल पार्क’ होणार आहे. याचा समाचार केदार दिघे यांनी घेतला. सोशल मीडियावर त्यांनी याबाबत पोस्ट टाकून शिंदे गटाचे वाभाडे काढले. ते म्हणाले, ठाण्याच्या जडणघडणीत धर्मवीर आनंद दिघे यांचे योगदान लक्षात घेऊन सेंट्रल पार्कला त्यांचे नाव दिले जाईल अशी तमाम ठाणेकरांची अपेक्षा होती, पण शिवसैनिक असल्याची बतावणी करणाऱ्या नव्या नमो सैनिकांनी या प्रकल्पाला मोदींचे नाव दिले. नमो नमो करत हा गट भाजपात विलीन होण्यास चालला आहे, हेच याचे संकेत आहेत.

शिवसेनाप्रमुख आणि धर्मवीर फक्त बॅनरवरील फोटोसाठी हवेत

वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांशी मिंध्यांनी केव्हाच फारकत घेतली आहे. आता शिवसेनाप्रमुख आणि धर्मवीरांचे फोटो या मिंध्यांना फक्त बॅनरवर छापण्यासाठी हवे आहेत. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचा विचार कधीही भाजपधार्जिणा नव्हता. केवळ सत्ता आणि केलेले गैरव्यवहार लपवण्यासाठी या मिंध्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली. जनता त्यांची जागा दाखवून देईल असेही दिघे यांनी सुनावले.