केईएमचे ’आरोग्य’ धोक्यात,6 वॉर्ड टीबी रुग्णालयात हलवणार ; रुग्णालयांच्या सुविधांकडे आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांचे दुर्लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरातून येणाऱया लाखो रुग्णांचे आशास्थान असलेल्या परळच्या केईएम रुग्णालयाच्या 6 वॉर्डची दुरवस्था झाली असून या वॉर्डमधील जवळजवळ 450 रुग्णांना महिनाभरात शिवडीच्या टीबी रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. आरोग्यसुविधा देणारी जुनी इमारत धोकादायक झाली असल्यामुळे रुग्णालय प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, रुग्णालयातील आरोग्यसुविधा तसेच इमारतींच्या देखभालीकडे पालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांनी दुर्लक्ष केल्यामुळे रुग्णालय प्रशासनावर ही वेळ आली आहे, असा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला आहे.

परळच्या केईएम रुग्णालयाच्या आवारात 103 इमारती असून मुख्य जुनी इमारत ही हेरिटेज वास्तूत मोडते. वेळोवेळी त्याची देखभाल आणि दुरुस्ती केली जाते. मात्र, 2018 मध्ये केईएममधील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. मात्र, त्याची वेळेत आणि योग्य ती अंमलबजावणी न झाल्यामुळे बहुतेक जुन्या इमारतींचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे केईएमच्या जुन्या इमारतीमधील वॉर्ड क्रमांक 4, 4 ए, 7, 8, 11 आणि 12 मधील रुग्णांना शिवडीच्या टीबी रुग्णालयातील दुसऱया, तिसऱया आणि चौथ्या मजल्यावरील वॉर्डमध्ये हलवण्यात येणार आहे. त्यामुळे ओपीडीला आलेला रुग्ण केईएममध्ये येईल, पण त्याला काही कारणांनी उपचारांसाठी ऍडमिट करायचे झाले तर टीबी रुग्णालयात करावे लागणार आहे. मात्र, शस्त्र्ाक्रिया करायची असेल तर त्याला केईएम रुग्णालयात दाखल करावे लागणार आहे.

महापालिकेचे केईएम रुग्णालय माफक दरात आरोग्य सुविधांसाठी ओळखले जाते. त्यामुळे दर तीन ते सहा महिन्यांनी पालिका आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त केईएमचा पाहणी दौरा करून आरोग्यसुविधा तसेच इमारतीच्या देखभालीचा आढावा घेतात. केईएममध्ये येणार्या लाखो रुग्णांचा विचार करता हे आवश्यकच आहे. मात्र, आयुक्त इकबालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी कोरोना काळापासून आतापर्यंत केईएम रुग्णालयाला एकदाही भेट घेऊन आढावा घेतलेला नाही. त्यांच्या दुर्लक्षामुळे इमारतींची अवस्था आणखी बिकट झाली असून रुग्णांना दुसरीकडे हलवण्याची वेळ रुग्णालयावर आली आहे.

– सचिन पडवळ, माजी नगरसेवक, शिवसेना

महात्मा गांधी रुग्णालयाचा पर्याय 

केईएम रुग्णालयाच्या शेजारी 5 मिनिटांच्या अंतरावर सर्व सुविधांनी पूरक नूतनीकरण झालेले केंद्र सरकारचे महात्मा गांधी कामगार रुग्णालय आहे तर शिवडीचे रुग्णालय केईएमपासून 25 मिनिटांच्या अंतरावर आहे. गांधी रुग्णालयात यात अनेक वॉर्ड रिक्त असून 7 ऑपरेशन थिएटर्स आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने गांधी रुग्णालयाच्या प्रशासनाकडे पाठपुरावा केला असता तर केईएम रुग्णांची हेळसांड होणार नाही, त्यांना टीबी रुग्णालय ते केईएम असे हेलपाटे मारावे लागणार नाही, अशी माहिती शिवसेना माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिली.