केरळ विधानसभेतील सीएएविरोधी ठराव घटनाबाह्य! राज्यपाल आरिफ मोहम्मद यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळ विधानसभेत सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी करायची नाही असा ठराव संमत करण्यात आला. परंतु हा ठरावच घटनाबाह्य आहे असे प्रतिपादन राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केले. हे प्रकरण केंद्र सरकार आणि संसदेच्या अखत्यारीत येते. त्यामुळे केरळ विधानसभेत असा ठराव मंजूर होऊ शकत नाही असे खान यांनी म्हटले आहे.

‘सीएए’ रद्द करण्याची राज्याची भूमिका नसल्याचे राज्यपालांनी थिरुवनंतपुरम येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबतचे सर्वाधिकार केंद्र सरकारला असल्याचे त्यांनी सांगितले. 29 डिसेंबर रोजी कन्नूर विद्यापीठात भारतीय इतिहास काँग्रेसच्या एका कार्यक्रमात ‘सीएए’ समर्थनार्थ राज्यपालांनी आपली भूमिका मांडली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा प्रचंड विरोध केला. केरळ विधानसभेत सीएएविरोधात मांडण्यात आलेला ठराव घटनाबाह्य असून हा गुन्हा असल्याचे ते म्हणाले.

इतिहासकार इरफान यांच्यावर मारहाणीचा आरोप
राज्यपालांचे भाषण थांबवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी उपस्थित इतिहासकार इरफान हबीब यांनी केला. यावेळी राज्यपालांना धक्काबुक्की झाल्याने त्यांनी हबीब यांनी आपल्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राज्यपालांनी केला. यावेळी कन्नूर विद्यापीठाचे कुलगुरू गोपीनाथन रविंद्रन आणि माझ्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांनी आपल्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचे राज्यपाल म्हणाले.