
आर्थिक चणचणीत असलेल्या ‘बीएसएनएल’च्या एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रामकृष्णन (52) असे मृताचे नाव होते. केरळमधील मल्लापुरम येथील बीएसएनएल कार्यालयात सफाई कामगार म्हणून ते कार्यरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रामकृष्णन हे भारत संचार निगम लिमिटेडमध्ये 30 वर्षांपूर्वी रुजू झाले होते. त्यांना मागील 10 महिन्यांपासून पगार मिळाला नव्हता. त्यांनी गुरुवारी सकाळी ते काम करत असलेल्या इमारतीच्या एका खोलीत पंख्याला गळफास लावून आयुष्य संपवलं. वेतन न मिळाल्याचा निषेध करणार्या कर्मचारी संघटनेने रामकृष्णन आर्थिक संकटातून जात असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, बीएसएनएल ही देशातील सर्वाधिक तोट्यात असलेली कंपनी आहे. आर्थिक वर्ष 2019 मध्ये बीएसएनएलला 13, 804 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

























































