शबरीमाला मंदिर परिसरात व्हिडिओग्राफी, फोटोग्राफीवर निर्बंध; सुरक्षेचे नियम काटेकोर पाळण्याचे केरळ हायकोर्टाचे निर्देश

संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेल्या शबरीमाला मंदिराच्या संकुलात व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी करण्यावर केरळ उच्च न्यायालयाने निर्बंध वाढवले आहेत. त्रावणकोर देवस्वोम बोर्ड (टीडीबी) तसेच स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी शबरीमाला मंदिराच्या धार्मिक मर्यादा आणि सार्वजनिक सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

न्यायमूर्ती अनिल के. नरेंद्रन आणि न्यायमूर्ती मुरली कृष्ण एस यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत. मंडला-मकरविलाक्कू उत्सवाच्या काळात न्यायालयाने आखून दिलेल्या निर्बंधांचे गंभीर उल्लंघन केले गेल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष आयुक्तांच्या अहवालात या गंभीर बाबी नमूद केल्या आहेत. त्याची दखल घेताना न्यायालयाने शबरीमाला मंदिर संकुलातील सुरक्षेचा मुद्दा स्वतःहून विचारात घेतला.

मंदिराच्या परिसरात निषिद्ध क्षेत्र असलेल्या ठिकाणी भाविक जातात आणि तेथे व्हिडीओग्राफी व फोटोग्राफी करतात. अशा रेकॉर्डिंग उपकरणांच्या गैरवापराबद्दल न्यायालयाने चिंता व्यक्त केली आणि पोलिसांना सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

शबरीमाला मंदिर येथील आपत्कालीन कार्य केंद्रात काम करणारा हंगामी कर्मचारी सोपानमजवळ हरिवरासनम विधीदरम्यान मोबाईल फोनमधून व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना आढळला. तसेच दुसऱ्या घटनेत थांका अंकीच्या मिरवणुकीचे दृश्य टिपण्यासाठी प्रसारमाध्यमांचे कॅमेरामन सोपानमच्या रेलिंगवर चढले होते. यातून धार्मिक क्षेत्रासंबंधी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याची गंभीर दखल केरळ उच्च न्यायालयाने घेतली आणि शबरीमाला मंदिर परिसरात व्हिडीओग्राफी व फोटोग्राफीवरील निर्बंध वाढवले आहेत.