
कळव्यातील खारेगाववासीयांना मृत्यूनंतरही मरणयातना भोगाव्या लागत आहेत. गेल्या वर्षभरापासून भुयारी मार्गाचे काम रखडल्याने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांना अडीच किलोमीटरचा फेरा मारून स्मशानभूमी गाठावी लागते. याबाबत अनेकदा आवाज उठवूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. लवकरात लवकर हा मार्ग सुरू करा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर माजिवडा ते वडपे रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी जवळपास चार महिने खारेगाव भुयारी मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता, मात्र याला वर्ष उलटून गेले तरी हा मार्ग सुरू करण्यात आलेला नाही. त्यामुळे रस्त्याच्या पलीकडे असलेल्या स्मशानभूमीत जाण्यासाठी अडीच किलोमीटरचा मोठा फेरा खारेगाववासीयांना मारावा लागत आहे. याची गंभीर दखल घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कळवा उपजिल्हाप्रमुख विजय देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक विभागप्रमुख संतोष कवळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे पत्रव्यवहार करून लक्ष वेधले.
जीव धोक्यात घालून प्रवास
खारेगाव येथील भुयारी मार्ग गेल्या वर्षभरापासून बंद आहे. 200 मीटरचा रस्ता वाचवण्यासाठी काही नागरिक भुयारी मार्गातील बांबूच्या परांज्यांतून आपला जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत. ठाणे-भिवंडी मार्गावरील नागरा पेट्रोल पंपाजवळ गेल्या 15 दिवसांत दोन भीषण अपघात झाले. यात तीन जणांना जीव गमवावा लागला. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक येथून प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा मार्ग सुरू करावा, अशी मागणी विभागप्रमुख संतोष कवळे यांनी केली आहे.


























































