श्री सिद्धनाथांचा पालखी सोहळा उत्साहात, खरसुंडी यात्रेत तीन लाख भाविकांची उपस्थिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खरसुंडी येथे सिद्धनाथांच्या चैत्र यात्रेत सासनकाठी व पालखी सोहळा अमाप उत्साहात पार पडला. यात्रेत सुमारे तीन लाखांहून अधिक भाविकांनी नाथनगरीत हजेरी लावली.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असणाऱया खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी विवाह सोहळ्यानिमित्त होणारा हा पालखी व सासनकाठी सोहळा शांततेत पार पडला. या सोहळ्यात चैत्र वद्य दशमीला देवाची लोखंडी सासने धावडवाडीचे मुस्लिम व विठलापूरचे बाड यांनी स्नानासाठी घोडेखूर येथे नेली. त्यानंतर ती जोगेश्वरी मंदिरात परत आणली. आज सकाळी सासनकाठी व पालखीने मिरवणुकीच्या सोहळ्यास सुरुवात झाली. पहाटे मुख्य मंदिरात अभिषेक झाल्यावर श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी देवीची अश्वारूढ पूजा बांधण्यात आली होती.

नित्योपचाराप्रमाणे धुपारती झाली. अकरानंतर गावोगावच्या सासनकाठय़ा मुख्य मंदिरात दाखल झाल्या. मंदिराच्या आवारात सासनकाठय़ा पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचवण्यात येत होत्या. यावेळी दर्शनासाठी आलेले भाविक सासनकाठीवर गुलाल व खोबऱयाची मुक्त उधळण करीत होते. एक वाजता आटपाडीच्या पाटील बंधूंची पांढरी शुभ्र सासनकाठी मंदिरात दाखल झाली. दोन वाजता धावडवाडीच्या मुस्लिम व विठलापूरच्या हिंदू मानकऱयांनी एकत्र नैवेद्य अर्पण केला.

दुपारी दोन वाजेपर्यंत मोठी गर्दी झाली. 2.30 वाजता देवस्थानचे प्रमुख मानकरी माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांचे गावाच्या वेशीवर आगमन झाले. त्यांच्या हस्ते पालखी पूजन व दर्शन झाल्यानंतर चांगभलंच्या जयघोषाने मानकऱयांनी पालखी उचलून मुख्य सोहळय़ास सुरुवात केली. अग्रभागी मंदिरातील पुजारी धुपारती, सेवेकरी, मानकरी, भालदार, चोपदार अशा पारंपरिक व शाही थाटाचा लवाजम्याने पालखीसह प्रस्थान केले. नगारखाना प्रवेशद्वारातून पालखी तीन वाजता मुख्य पेठेत दाखल झाल्यावर भाविकांनी गुलाल खोबऱयाची उधळण केली.

मुख्य पेठेतून गुलाल खोबऱयाची उधळण झेलत पालखी सोहळा जोगेश्वरी मंदिरात पोहोचला. तत्पूर्वी महादेव मंदिराच्या प्रांगणात सर्व सासनकाठय़ा पालखीला टेकवून सलामी देण्यात आली. जोगेश्वरी मंदिरात पानसुपारी झाल्यानंतर प्रथेप्रमाणे टकऱया घडशी यांनी सासनकाठीला टक्कर दिली व पालखीचा परतीचा प्रवास सुरू झाला. यावेळी पालखीसोबत देवाच्या लोखंडी सासनकाठय़ा होत्या.

पालखी मुख्य मंदिरात पोहोचल्यानंतर श्रीफळ वाढवण्यास सुरुवात झाली. यात्रा शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी देवस्थान समिती, ग्रामपंचायत, बाजार समिती, महसूल व पोलीस प्रशासन, सेवेकरी व मानकरी यांनी परिश्रम घेतले.