मोरवंडे पिंपळवाडीत दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन, ग्रामस्थामध्ये चिंतेचे वातावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेड तालुक्यातील मोरवंडे पिंपळवाडी येथे मानवी वस्तीनजीक दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होऊ लागले असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. भक्ष्याच्या शोधात अगदी घराच्या अंगणात येणाऱ्या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात बिबट्याने दर्शन दिले होते.

रस्त्यात मधोमध बसलेला बिबट्या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी पाहिला होता. त्यानंतर या बिबट्याने भोस्ते गावच्या हद्दीत येणाऱ्या जंगलामध्ये जनावरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यांना दर्शन दिले होते. मात्र आता हा बिबट्या मोरवंडे पिंपळवाडी येथे मानवी वस्तीत दिसू लागला असल्याने बिबट्याच्या भितीने ग्रामस्थ घराबाहेर पडेनासे झाले आहेत. काही दिवसांपूर्वी मोराडे-भोस्ते गावाची सीमा असलेल्या अलसुरे गावात बिबट्यांनी पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडला होता.

त्यानंतर या परिसरात या बिबट्याचे वास्तव्य असल्याचे अनेकांनी पाहिले होते. आता या बिबट्याने आपले ठिकाणी बदलले असून अलसुरे येथील जंगलातून तो आता भोस्ते मार्गे मोरवंडे पिंपळवाडी येथे दाखल झाला आहे. आठ दिवसांपूर्वी पिंपळवाडी येथील एक गृहिणी रानात चरण्यासाठी गेलेल्या म्हशी आणण्यासाठी भोस्ते येथील जंगलात गेली होती. त्यावेळी तिच्यासोबत तिचा 10 वर्षांचा नातूही होता. रानात अचानक बिबट्याने डरकाळी फोडल्याने तिचा नातू आणि ती कमालीची घाबरून गेली. रानात चरायला गेलेल्या म्हशी तशाच सोडून त्यांनी घर गाठले. त्यानंतर या परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होवू लागले असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मोरवंडे पिंपळवाडी, बौद्धवाडी येथील अनेकजण लोटे औद्योगिक वसाहतीत नोकरी करतात. दुसऱ्या पाळीतील कामगार रात्री उशिरा घराकडे येतात. त्यामुळे मुंबई गोवा हायवे ते मोरवंडे पिंपळवाडी-बौद्धवाडी या रस्त्यावर रात्री उशीरापर्यंत कामगारांची वर्दळ असते. गेले दोन दिवस दर्शन देणारा बिबट्या या वर्दळीच्या रस्त्याशेजारीच ठाण मांडून बसल्याचे निदर्शनास येत असल्याने रात्री-अपरात्री कामावरून उशीरा घरी येणाऱ्या कामगारांवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांची चिंता वाढविणाऱ्या या बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी वनविभागाकडे करण्यात आली आहे.