
खेड तालुक्यातील घाणेखुंट गवळीवाडी येथील एका गोडाऊनवर धाड टाकून पोलिसांनी जप्त केलेल्या 8 लाख गुटख्याचे कर्नाटक कनेक्शन असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी खेड आणि चिपळूण येथील आणखी 17 जणांची कसून तपासणी सुरु केली आहे. हे सारेजण तैयब मेनन याच्याकडून गुटखा खरेदी करणारे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
खेड तालुक्यातील लोटे परिसरातील घाणेखुंट गवळीवाडी येथील एका गोडाऊनमध्ये आर एम डी आणि विमल गुटखा मोठा प्रमाणात साठा करून ठेवला असल्याची माहिती खेड पोलीस स्थानकाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांना मिळाल्यावर गडदे यांनी या गोदामावर धाड टाकून सुमारे 8 लाख 60 हजार रुपयाचा गुटखा जप्त केला.
या प्रकरणी गोडावून मालक तैयब मेनन याला अटक करून त्याची चौकशी सुरु केली असता विक्रीला बंदी असलेला गुटखा कर्नाटकातून महाराष्ट्रात येतो तसेच या प्रकरणात अनेकजण गुंतले असल्याचे पुढे आले. पोलिसांनी आता त्या दिशेने तपास सुरु केला असून तैयब मेनन यांच्याकडून गुटखा खरेदी करून तो विकणाऱ्या तब्ब्ल 17 जणांची चौकशी सुरु केली आहे. या चौकशीत अनेक गोष्टी बाहेर येत असल्याने या प्रकरणाचा लवकरच पर्दाफाश करू, असा विश्वास या प्रकरणाचा तपास करणारे खेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी व्यक्त केला आहे.
खेड पोलिसांच्या या कारवाईनंतर लपून छपून गुटखा विकणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. त्यातच पोलिसांनी काही टपरीधारकांची चौकशी सुरु केल्याने दामदुप्पट भावाने गुटख्याची विक्री करणाऱ्यांनी टपरीवरून गुटखा गायब केला आहे. त्यामुळे गुटखा चघळल्या शिवाय चैन न पडणाऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे. गुटखा प्रकरणाशी कर्नाटक कनेक्शन असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी कर्नाटक राज्यातून गुटखा कुठून आणि नेमका कसा महाराष्ट्रात येतो याचा शोध सुरु केला आहे.






























































