
सामना प्रतिनिधी। खेड
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कुठेही कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी दिली आहे. खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंदोबस्त ठेवण्यात आला असून या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खेड शहरातून नुकतेच संचलन केले. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान 23 एप्रिल रोजी होत आहे. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झालं आहे. रायगड लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या खेड तालुक्यात पोलिसानी चोख बंदोबस्त ठेवला आहे. राज्य राखीव दलाचे 60 जवान तसेच 175 अतिरिक्त पोलीस कर्मचारी खेडमध्ये तैनात करण्यात आले आहेत. तालुक्यात संवेदनशील मानल्या जाणाऱ्या मतदान केंद्रावर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवैध धंद्यांच्या विरोधात धाडसत्र सुरु केले आहे. मटका, जुगार, गावठी दारूचे गुत्थे हटवण्यात आल्याने अवैध धंदे करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत. रात्री उशिरा पर्यंत चालणारे हॉटेल्स , चहाच्या टपऱ्या चायनीज गाड्या वेळेत बंद करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उलंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जात आहे.
निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याचा पोलीस प्रामाणिक प्रयत्न करत आहेत त्यांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी केले आहे.


































































