खेडमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरं फोडून लाखोंचा माल लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेडमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून ग्रामीण भागाला लक्ष केले आहे. महामार्ग आणि खेड रेल्वे स्थानकानजीक असलेल्या वेरळ आणि खवटी गावात घरफोडी करुन पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले. दिवसाढवळ्या घरफोडी झाल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे.

गेले काही महिने खेड तालुका हा चोरट्यांचा रडारवर नव्हता. त्यामुळे पोलीस प्रशासनही चोरट्यांच्या बाबतीत निर्धास्त होते. मात्र आता चोरटयांनी पुन्हा एकदा खेड तालुक्याला लक्ष करून पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. मात्र यावेळी शहराऐवजी चोरटयांनी ग्रामीण भागाला लक्ष केले आहे. महामार्ग आणि खेड रेल्वे स्थानकानजीक असलेल्या वेरळ गावातील एक घर चोरटयांनी दिवसाढवळ्या फोडले मात्र या घरात चोरट्यांच्या हाताला फारसे काही लागली नाही. त्यानंतर चोरटयांनी आपला मोहरा महामार्गावावरील खवटी गावाकडे वळवला. या गावामध्ये बंद अवस्थेत असलेली दोन आलिशान घरे फोडून चोरटयांनी लाखो रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. यामध्ये रोख रक्कम , एलईडी टीव्ही , होम थियेटर , रोख रक्कम तसेच अन्य मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.

गेले काही महिने तालुक्यात कुठेही चोरीची चर्चा नव्हती त्यामुळे ग्रामस्थ निर्धास्त होते. मात्र आता चोरट्यानी पुन्हा डोकं वर काढले असून दिवसाढवळ्या चोऱ्या होऊ लागल्या असल्याने ग्रामीण भागातील जनतेमध्ये चोरटयांनी दहशत निर्माण केली आहे.

जनतेच्या मालमत्तेवर चोरटयांनी डल्ला मारू नये यासाठी पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहेत. रात्री शहर व परिसरात पोलिसांची गस्त सुरु आहे. मात्र चोरटे पोलिसांच्या दोन पावले पुढे आहेत. शहरी भागात पोलीस रात्रीची गस्त घालत असतात हे चोरट्याने माहित असल्याने चोरट्याने चोरी करण्यासाठी गामीण भागाची निवड केली आहे. गावात बंद असलेली घरे हे चोरटे दिवसा जाऊन हेरून ठेवतात आणि मध्यरात्री सगळीकडे सामसूम झाली की चोरटे बंद घरांचे दरवाजे तोडून हाताला जे काही लागेल ते घेऊन पसार होतात.

रात्री च्या काळोखात ज्या चोरट्यांकडून चोऱ्या केल्या जात आहेत ते चोरटे दिवसा गावात काही-बाही विकण्याच्या किंवा भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने आलेले असतात. ग्रामस्थांशी सवांद साधताना ते गावातील घरांची पाहणी करतात आणि रात्रीअंधार पडला की त्या घरावर डल्ला मारून जे काही हाताला लागेल ते घेऊन पसार होतात. चोरटे याच पद्धतीने चोरी करत आहेत. त्यामुळे गावात कोणी भंगार घेण्यासाठी, किंवा अन्य काही सामान विकण्यासाठी आला असेल आणि त्याच्या हालचालींवर कुणाला संशय असेल तर त्याने त्या विक्रेत्याबाबत तात्काळ पोलिसांनी कळवावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.