
पाच लाख रुपयांसाठी सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. यश कोळी असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. सागर कृष्णाप्पा गायकवाड (रा. महालिंगेश्वरनगर, होटगी रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
दीपक शिवाजी कोळी (रा. बसवेश्वरनगर, ता. होटगी रोड) हे रेल्वे स्टेशन येथे हमालीचे काम करतात. त्यांना दोन मुली व यश अशी तीन मुले आहेत. कोळी हे देवकार्यासाठी मूळगाव असलेल्या औराद (द. सोलापूर) येथे गेले होते. दुपारी चारच्या सुमारास यश घरासमोर खेळत असताना त्याचे अपहरण करण्यात आले. घरात शोधाशोध सुरू असताना रात्रीच्या सुमारास दीपकच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने पाच लाख रुपयांची मागणी करत पैसे न दिल्यास मुलास जिवे मारण्याची धमकी दिली.
दीपकने विजापूर नाका पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दिली असता तातडीने तपासाची चक्रे फिरली. संशयावरून सराईत गुन्हेगार सागर गायकवाड याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने अपहरण केल्याची कबुली दिली. यशला त्याची आजी कस्तुराबाई गायकवाड हिच्याकडे ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी सुखरूपपणे यशला ताब्यात घेऊन कुटुंबीयाकडे सुपूर्द केले. विजापूर नाका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील व सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोतहाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

































































