मौजमजेसाठी मारला डल्ला, चावीचा केला गैरवापर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने मौजमजेसाठी शेजारी राहणाऱ्या महिलेच्या घरात डल्ला मारणाऱ्या तरुणीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. उषा उमेश भूमा असे तिचे नाव असून तिच्याकडून 68 हजारांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. चोरीच्या गुन्ह्यात उषाला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार हे एमआयडीसी येथील एका चाळीत राहत असून तेथेच उषा राहते. उषा पूर्वी बेबी सीटिंगचे काम करत असायची. मात्र लॉकडाऊनमुळे तिच्याकडे काम नव्हते. तिचे तक्रारदार यांच्या घरी नेहमी येणे-जाणे असायचे. त्यामुळे तक्रारदार यांनी त्यांच्या घराची एक चावी उषाच्या घरी ठेवली होती. गेल्या महिन्यात तक्रारदार यांचे नातेवाईक रुग्णालयात अॅडमिट असल्याने ते पत्नीसोबत रुग्णालयात गेले. घरात कोणी नसल्याचे पाहून झटपट श्रीमंत आणि मौजमजेसाठी तिने तक्रारदार यांच्या घरी डल्ला मारण्याचे ठरवले. उषाने चावीने तक्रारदार यांचे घर उघडले. घरातून 3 लाख 7 हजार रुपयांचे दागिने चोरले. चोरलेले ते दागिने तिने अंधेरी येथील एका ज्वेलर्सकडे गहाण ठेवून काही रक्कम घेतली.

घटनेच्या दुसऱ्या दिवशी तक्रारदार यांची पत्नी घरी आली. तेव्हा तिला घरात दागिने दिसले नाहीत. दागिने चोरीप्रकरणी तक्रारदार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंत फड यांच्या पथकाने तपास सुरू केला. चोरी कोणी केली हे स्पष्ट होत नव्हते. पोलिसांना उषावर संशय होता. तिच्या हालचाली पोलिसांना सुरुवातीपासून संशयास्पद वाटत होत्या. पोलिसांचे पथक महिनाभर तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. अखेर पोलिसांनी उषाला ताब्यात घेऊन चौकशी केली. कसून चौकशी केल्यावर तिने दागिने चोरल्याचे पोलिसांना सांगितले. चोरीचे दागिने तिने अंधेरी येथील एका ज्वेलर्सकडे गहाण ठेवले होते.