वातावरणीय बदलामुळे  पर्यावरणाचे संरक्षण होणे गरजेचे! दहिसर येथील ई-व्हेईकल भित्तशिल्पाचे महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते अनावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकीकडे प्रदूषण वाढत असताना वातावरणीय बदलामुळे पर्यावरणाचे संरक्षणदेखील होणे गरजेचे आहे. याबाबत अनेक उपाययोजना प्रशासनामार्फत करण्यात येत असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. दहिसर चेकनाक्याजवळील ई-व्हेईकल भित्तशिल्पाचे अनावरण आणि समाजकल्याण केंद्राचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते पार पडले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

मुंबईत वाढत्या प्रदूषणाचा विषय गंभीर बनला आहे. राज्य सरकारदेखील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध उपाययोजनांबाबत अनेक पावले उचलत असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी व जनजागृतीसाठी दहिसरचे प्रभाग क्रमांक 3 चे नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांच्या प्रयत्नातून दहिसर चेकनाक्याजवळ ई-व्हेईकल भित्तशिल्प उभारण्यात आले आहे. तसेच या वेळी समाजकल्याण केंद्राचे उद्घाटनदेखील करण्यात आले. सदर ई-व्हेईकल भित्तचित्र पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले असल्याची माहिती नगरसेवक ब्रीद यांनी दिली.

कार्यक्रमाला विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे, उपमहापौर सुहास वाडकर, प्रभाग समिती अध्यक्ष सुजाता पाटेकर, विभागप्रमुख सुजाता शिंगडे, महापालिका उपायुक्त भाग्यश्री कापसे, सहाय्यक आयुक्त मृदुला अड्डे, शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.