बोलीभाषेची समृद्धी – कोलामी बोली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वर्णिका काकडे

कोलामी ही महाराष्ट्रातील यवतमाळ, नांदेड, वर्धा आणि चंद्रपूर परिसरातील कोलाम आदिवासी समुदायाची द्राविडियन कुळातील स्वतंत्र बोलीभाषा आहे. ही बोलीभाषा गोंडपेक्षा वेगळी असून तिच्यावर तेलुगू व कानडी भाषेचा प्रभाव आढळतो. काही बाबतीत कोलामी ही तेलुगूसोबत मिळती जुळती आहे आणि काही बाबतीत कानडीप्रमाणे आहे. तसेच आसपासच्या परिसरातील संवाद संपर्कात आल्यामुळे भिल्ली भाषेचा प्रभावही या बोलीवर जाणवतो.

भाषा अभ्यासक डॉ. ग्रीर्सन यांच्या मतानुसार, भाषाशास्त्राच्या संदर्भाने, कोलाम हे द्रविड जमातींचे उर्वरित वंशज असावेत. हे असे वंशज ज्यांनी मुख्य द्रविडी भाषेच्या विकासात कधीही भाग घेतला नाही किवा ज्यांनी कधीही द्राविडी भाषा अंगिकारली नाही.

कोलामी आदिवासी प्रामुख्याने डोंगराळ आणि जंगलाच्या भागात आणि मुख्य गावापासून काही अंतर राखून आपले वेगळे गाव म्हणजे पोड तयार करून राहतात. ज्या प्रदेशात ते वस्ती करून राहतात   तिथला प्रभाव दिसून येतो. स्वजातीय लोकांची एक वेगळी वस्ती करून राहण्याची नेमकी कारणे समजत नाहीत. हा समाज भटक्या नाही, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहणे यांनाही पसंत आहे. पण काही अपवादात्मक परिस्थितीत कोलाम लोक आपली वस्ती अन्यत्र हलवितात. प्रामुख्याने विदर्भ आणि लगतच्या प्रदेशातील डोंगराळ भागांत त्यांची स्वतंत्र वस्ती असते, ज्याला ‘पोड‘ म्हणतात.

कोलामांची सगळ्यात महत्त्वाची देवता म्हणजे माहूरची श्री रेणुका देवी. सगळ्या कोलाम पोडांवर रेणुका देवीची प्रतिकृती समजली जाणारी यल्लम्मा/पोचम्मा देवी या देवतेची स्थापना करण्यात येते. यल्लमा देवीच्या प्रथा परंपरांमधील शब्द या बोलीत प्रचलित आहेत. कर्नाटक सीमा भागात या देवतेचे प्रस्थ अधिक दिसून येते. म्हणजेच या भागात कोलामींची वस्ती आणि त्यानुसार भाषेचा प्रभाव, आदानप्रदान दिसून येते.

यवतमाळ परिसरातील कोलामी बोलीत भिल्ली भाषेचा प्रभाव जाणवतो. कोलामांना कोलावार व नाईक असेही संबोधितात. त्यांना गोंड लोक भूमक अगर पुजारी म्हणतात. आदिलाबादेतील तेलुगू लोक त्यांना मन्योड म्हणतात. मन्ने पोड लोकांप्रमाणेच ते शेती करतात, म्हणून त्यांना मन्योड हे नाव पडले असावे. डोंगरावरील कोलामांना गुत्ता मन्योड असे चिन्नूर व सिरपूर भागात म्हणतात. आदिलाबाद व नांदेड या जिल्ह्यांत मन्नेवारलू या नावाने ओळखले जाणारे लोक कोलामच होत.