कोल्हापूर – शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ, करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिरात विधिवत घटस्थापना

प्रतिवर्षी पाय ठेवायलाही जागा नसलेल्या मंदिरात यंदा कोरोनाच्या संकटामुळे भाविकांचा शुकशुकाटा असला तरी चैतन्यदायी आणि मंगलमय वातावरणात आजपासून पारंपरिक शारदीय नवरात्रौत्सवास सर्वत्र सुरुवात झाली. सकाळी साडेआठच्या सुमारास मानाच्या तोफेची सलामी होऊन, साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिर, ऐतिहासिक जुना राजवाडा येथील तुळजाभवानी मंदिर, वाडीरत्नागिरी येथील दख्ख़नचा राजा श्रीजोतिबासह शहरातील विविध मंदिरांमध्ये विधिवत घटस्थापना झाली.

पहाटेपासूनच मंदिरात धार्मिक विधीने पारंपरिक नवरात्रोत्सवास सुरुवात झाली.सकाळी साडे आठच्या सुमारास तोफेची सलामी दिल्यानंतर श्रीपूजकांच्या उपस्थितीत श्रीअंबाबाई मंदिरात घटस्थापना झाली. यानंतर आरती, साडेअकरा वाजता पंचामृत अभिषेक व दुपारी दोन वाजता आरती होऊन,आज पहिल्या दिवशी देवीची कुण्डलिनी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. तसेच ऐतिहासिक जुना राजवाडा येथील श्रीतुळजाभवानी मंदिरातही पहाटे 5 च्या सुमारास देवीला अभिषेक घालुन,परंपरेनुसार घटस्थापना करण्यात आली.शहरातील नवदुर्गा मंदिरातही घटस्थापना पारंपरिक उत्साहात झाली. तर सनई, तुतारी, ढोल, ताशाच्या निनादात दख्खनचा राजा श्रीजोतिबा डोंगरावर नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला. घरोघरीही विधिवत घटस्थापना करण्यात आली. सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांतर्फे दुर्गेची प्रतिष्ठापना करण्यात आली. यामुळे जिल्ह्यात सर्वत्र उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढु नये यासाठी राज्यातील सर्व मंदिरे अजुनही भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे यंदा लोक- सहभागाशिवाय प्रथमच नवरात्रौत्सव होत असुन, गर्दी होऊ नये यासाठी गरबा, दांडिया, सोंगीभजन, महाप्रसाद आदी सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केेले आहेत. प्रथेनुसार सर्व धार्मिक विधी व सोहळे संबंधित पुजारी व मानक-यांच्या उपस्थितीत होत आहेत. आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिरे उजळुन गेली आहेत.

img-20201017-wa0027

मंदिरांत भाविकांची गर्दी नसली तरी भाविकांना देवीच्या दर्शनासाठी शहरात ठिक- ठिकाणी भव्य एलईडी स्क्रीन उभारण्यात आल्या आहेत. तसेच ऑनलाईन दर्शनाची स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या