
खराब रस्त्यांवरच नवीन रस्ते तयार करण्यात येत असताना, त्यात आता गटारींचीही भर पडली आहे. ठेकेदारांची मनमानी आणि महापालिकेतील अधिकाऱयांच्या दुर्लक्षामुळे आता मोठय़ा गटारी छोटय़ा झाल्याचे दिसून येत आहे. जुन्या गटारींमधील गाळ काढण्याऐवजी त्यावरच नवीन गटार बांधण्यात येत असल्याने सांडपाणी थेट रस्त्यावरच वाहताना दिसत आहे. शिवाय घरांतही सांडपाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाल्याने नागरिकही धास्तावले आहेत. त्यामुळे विकासकामांच्या नावाखाली लाखो रुपये वाया जात असून, ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशीच अवस्था महापालिकेची झाल्याचे चित्र आहे.
कोल्हापूर शहरातील रस्ते नेहमीच वादग्रस्त ठरले आहेत. एखादा खराब रस्ता नवीन करताना तो उकरून काढण्याऐवजी त्यावरच खडी अंथरून नवीन रस्ता केला जातो. त्यामुळे सध्या सर्वत्र रस्ते वर आणि घरांचा उंबरा खाली गेल्याचे चित्र आहे. याचा फटका आता पावसाळ्यात नागरिकांना आणि व्यावसायिकांना बसू लागला आहे. जोरदार पावसामुळे पाणी थेट घराघरांत आणि दुकानांत घुसत असल्याने नागरिक त्रस्त होत आहेत. एकीकडे शहरीकरण मोठय़ा प्रमाणात वाढत असताना, त्या प्रमाणात मूलभूत सुविधांची मात्र आजपर्यंत वानवाच असल्याचे चित्र आहे. पावसामुळे तर रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे.
रस्तेकामातील लाखो रुपये वाया गेले असतानाच, आता सांडपाणी वाहून नेणाऱया गटारींचाही प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात सध्या ठिकठिकाणी जुन्या गटरी काढून नवीन गटारी बांधण्यात येत आहेत. वाढते शहरीकरण, तसेच गेल्या दोन-तीन वर्षांपासून पावसामुळे तुंबणारे पाणी पाहता, जुन्या छोटय़ा गटारी मोठय़ा करणे गरजेचे आहे. परंतु सध्या काही ठिकाणी जुन्या गटारींचे नवीन बांधकाम करताना त्यांतील गाळ काढण्याऐवजी त्यावरच गटारी बांधण्यात येत आहेत. त्यामुळे सांडपाणी नागरिकांच्या घरांत शिरणार आहे. त्यामुळे रस्त्यांबरोबरच आता गटारींचे पाणी घरांत शिरण्याच्या भीतीने नागरिक धास्तावले आहेत. सदर बाजार परिसरातील ठेकेदाराकडून अशा प्रकारे गटरींवर गटारी करून येथील परिस्थिती आणखीनच बिकट करून ठेवली आहे.
पाइपलाइनच्या नावाखाली ठेकेदारासाठी नव्या रस्त्यावर खोदाई?
एखाद्या ठिकाणी चांगला नवा रस्ता केल्यास अवघ्या काही दिवसांत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तेथे पाइपलाइनसाठी खोदकाम करण्यात येते. याद्वारे संबंधित नवीन रस्त्याची गॅरंटी त्या ठेकेदाराकडून देता येऊ नये, यासाठीच हे खोदकाम केल्याची तक्रार अनेक वेळा नागरिकांनी केली आहे. तरीसुद्धा पाणीपुरवठा विभागाच्या कारभारात फरक पडलेला दिसत नाही. नवरात्रोत्सवात करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात गुजरी येथील एका नवीन रस्त्याबाबत हा प्रकार झाला आहे.
























































