40 वर्षांच्या लढ्याला यश; कोल्हापूर खंडपीठ 18 ऑगस्टपासून कार्यान्वित,रत्नागिरी, सिंधुदुर्गसह सहा जिह्यांना दिलासा

बहुप्रतीक्षित व बहुचर्चित अशा मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचा कारभार अखेर येत्या 18 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. हे खंडपीठ व्हावे यासाठी तब्बल 40 वर्षे लढा सुरू होता. विविध प्रकारची आंदोलने झाली. या सर्वाला आज अखेर यश आले.

मुंबई, नागपूर व छत्रपती संभाजीनगरनंतर आता हे चौथे खंडपीठ महाराष्ट्रात कार्यान्वित होईल. तशी अधिकृत अधिसूचना मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे यांनी शुक्रवारी जारी केली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सांगली व सातारा या जिह्यातील सर्व फौजदारी व दिवाणी याचिकांवर या खंडपीठासमोर सुनावणी होईल. या जिल्हय़ातील नागरिकांना न्यायासाठी आता मुंबईपर्यंत पायपीट करावी लागणार नाही.

या खंडपीठामुळे या सर्व जिह्यांतील 50 ते 60 हजार प्रलंबित खटले व दावे जलदगतीने निकाली निघतील, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनीदेखील हे खंडपीठ स्थापन झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.

न्यायमूर्तींची संख्या अनिश्चित

एकल व खंडपीठांसमोर कोल्हापूर खंडपीठात सुनावणी होईल, असे शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत नमूद आहे. मात्र किती न्यायमूर्ती कोल्हापूर खंडपीठात काम करतील याचा तपशील अधिसूचनेत देण्यात आलेला नाही

मुंबईचा भार कमी होईल 

कोल्हापूर खंडपीठाचे कामकाज सुरू झाल्याने मुंबई उच्च न्यायालयावरील ताण कमी होईल. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर रायगड, नाशिक व पुणे जिह्यातून येणाऱया याचिका व अपिलांवर केवळ मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होईल.