कोल्हापुरात प्रचाराच्या तोफा थंडावल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या महिनाभरापासून आरोप-प्रत्यारोप आणि टोकाला गेलेल्या इर्ष्येमुळे अत्यंत चुरशीच्या बनलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची प्रचाराची आज सांगता झाली. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी आता छुप्या प्रचाराला वेग आला आहे.

प्रचाराची आज सांगता असल्याने रविवारी सुट्टीची संधी साधून उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा धडाका लावला. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचाराची सांगता आज जबरदस्त महारॅली काढून शक्तिप्रदर्शनाने झाली. गांधी मैदान येथून शहराच्या प्रमुख मार्गावरून ऐतिहासिक दसरा चौक येथे ही रॅली काढण्यात आली. यावेळी शिवसेना सचिव व खासदार विनायक राऊत, शिवसेना कोल्हापूर जिल्हा संपर्कमंत्री व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, पालकमंत्री सतेज पाटील, डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, वैशाली क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्यासह विविध सामाजिक उद्योजक संघटना तसेच महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षाचे व मित्र पक्षांचे पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष, आजी-माजी नगरसेवक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.