
सामना प्रतिनिधी । कोल्हापूर
पूरग्रस्त कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली असली तरी जोर कमी राहिला. राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक ६ खुला करण्यात आला आहे. यामधून २८२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर पंचगगेची पाणी पातळी सध्या तासाला तीन इंचाने उतरु लागली आहे. अजून ही २५ बंधारे पाण्याखाली असून, जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून महापुरामुळे बंद झालेले बहुतांश सर्वच रस्ते खुले होऊन वाहतूक सुरळीत होऊ लागली आहे.
जिल्ह्यात एकूण २५ हजार ८४४.४९ मि.मी. पावसाची नोंद
गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात एकूण ९०.२३ व सरासरी ७.५२ तर आतापर्यंत एकूण २५ हजार ८४४.४९ व सरासरी २ हजार १५३.७१ मि.मी. पावसाची नोंद झाली.
तालुका निहाय गेल्या चोवीस तासांत, कंसात आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची आकडेवारी अशी -हातकणंगले-१.५० (७५९.७९), शिरोळ-निरंक (५३१.७१), पन्हाळा – ६.४३(२०७३.१४), शाहूवाडी-१२.१७(२४०३) , राधानगरी-९.६७(२५७८.५०), गगनबावडा- २५(५१५३), करवीर-३.७३(१५८८.४५), कागल -१.७१(१७०२.२९), गडहिंग्लज-१.८६(१३०२. ७१), भुदरगड-७(२३०३), आजरा-९(२७७६.२५), आणि चंदगड- १२.१७(२६७१.८३) मि.मी. अशी पावसाची नोंद झाली.
धरणसाठा आणि विसर्ग
सकाळी सातच्या सुमारास राधानगरी धरणात ८.३१ टिएमसी पाणीसाठा असून धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक ६ खुला आहे. त्यामधून २ हजार ८२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. कोयना धरणात ९९ टीएमसी इतका पाणीसाठा असून, धरणातून २५ हजार ५३४ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. तर कर्नाटकातील अलमट्टी धरणात १०१.६७ टीएमसी पाणी साठा होता.
जिल्ह्यातील चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, कोदे लघुप्रकल्प, पाटगाव व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. तर तुळशी-३.४१, वारणा-३२.५९, दूधगंगा-२४.४७, कासारी-२.६६, कडवी-२.५२, कुंभी-२.६१, पाटगाव-३.७२, चित्री -१.८८, चिकोत्रा-१.४८, जंगमहट्टी-१.२२, घटप्रभा -१.५६, जांबरे-०.८२ तर कोदे (ल.पा.)-०.२२ टीएमसी असा पाणीसाठा आहे.
पंचगंगा पातळीत तासाला तीन इंचाने घट
पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी ७ च्या सुमारास वाजता ३५ फूट होती. त्यामुळे महापुरावेळी तब्बल ५५ फुट ७ इंचापर्यंत गेलेल्या या पाणीपातळीत आतापर्यंत २० ते २१ फुटाची घट झाली आहे. पंचगंगा, भोगावती, तुळशी, वारणा, कासारी, हिरण्यकेशी, दुधगंगा या नदीवरील एकूण २५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा ३५, सुर्वे-३४.३, रुई-७०.६, इचलकरंजी-६८, तेरवाड- ६८, शिरोळ-६४, नृसिंहवाडी-६४, राजापूर- २२.११ फूट तर नजीकच्या सांगली बंधाऱ्यावर २९ आणि अंकली येथे ३७.१ फूट अशी पाणीपातळी होती.
कोल्हापूर डिझास्टर रिलिफ फंड खात्यात मदत करावी
जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोल्हापूर डिझास्टर रिलिफ फंड या नावाने बँक ऑफ इंडियाच्या शाहूपुरी शाखेत खाते उघडण्यात आले आहे. त्याचा खातेक्रमांक पुढीलप्रमाणे आहे. 090110110018730,IFSC CODE BKID0000901 असा असून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी या खात्यामध्ये मदत जमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.

























































