कोल्हापूर जिह्यातील २४ बंधारे पाण्याखाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर

दोन दिवसांपासून काहीसा ओसरलेल्या पावसाने आज जिह्यात पुन्हा हजेरी लावली. धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम राहिला. पंचगंगेच्या पाणी पातळीतही इंचाने घट होत असून, राजाराम बंधाऱ्यावरील सकाळी २६.१० फुटाची पाणीपातळी सायंकाळी सात वाजता २६.२ फुटांवर आली होती. जिह्यातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने आज तब्बल २४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

गेल्या २४ तासांत जिह्यात एकूण २७४.०९ व सरासरी २२.८४ मि.मी.पावसाची नोंद झाली. यामध्ये गगनबावडा – ५८.५०, कागल – ९.५७, हातकणंगले – ४.९४, शिरोळ – ५.२८, पन्हाळा – १३.१४, शाहूवाडी – ५१.३३, राधानगरी – ३४.५०, करवीर – ५.१८, गडहिंग्लज – ५.४२, भुदरगड – २३.४०, आजरा – १७ आणि चंदगड – ४५.८३ मि.मी.अशी पावसाची नोंद झाली. दरम्यान, पावसामुळे केर्ली (ता. शाहूवाडी) येथील विद्यामंदिराच्या छताची आणि गजानन पाटील यांच्या जनावरांच्या गोठय़ाची पडझड झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आली.

नृसिंहवाडीतील संगम मंदिर निम्मे पाण्याखाली

शिरोळ

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा या दोन नद्यांच्या पाणीपातळीत गेल्या २४ तासांत तीन फुटांनी वाढ झाली आहे. पाणीपातळी वाढल्याने कृष्णा-पंचगंगा संगमावरील संगम मंदिर निम्याहून अधिक पाण्याखाली गेले आहे. तर नृसिंहवाडी येथील श्रीदत्त मंदिराजवळ कृष्णा नदीचे पाणी आले आहे. कुरुंदवाडसह परिसरात आज दिवसभर दमदार पाऊस झाल्याने पेरणी करून पावसाची वाट पाहत असलेला बळीराजा सुखावला आहे. दरम्यान, कृष्णा नदीचे पाणी वाढत असल्याने दत्त देव संस्थानच्या कर्मचाऱयांनी मंदिर परिसरातील नदीकाठचे साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू केले आहे.