कोल्हापुरात पती-पत्नीची मुलासह आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

पती-पत्नीने मुलासह दोरीने स्वतःला एकत्र बांधून घेत कुंभी नदीत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पन्हाळा तालुक्यातील गोठे येथे समोर आला आहे. दरम्यान, त्यांची 16 वर्षांची मुलगी मामाच्या गावी गेल्याने या घटनेतून बचावली आहे.

दीपक शंकर पाटील (वय 40), पत्नी वैशाली (वय 35) आणि मुलगा विघ्नेश (वय 14) अशी मृतांची नावे आहेत. गोठे गावात वडील, पत्नी आणि दोन मुलांसह राहणारे दीपक पाटील हे शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करीत होते. दीपक आणि वैशाली या पती-पत्नीने मुलगा विघ्नेश याला दोघांच्या मध्ये दोरीने बांधून, कुंभी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. पन्हाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह बाहेर काढले.

गावात सुखी कुटुंब असलेल्या या पती-पत्नीने मुलासह आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात होती. कळे पोलिसांत ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे.

जीवनात अयशस्वी झाल्याने आत्महत्या?

दीपक पाटील यांनी घरात ‘सुसाइड नोट’ लिहून ठेवली आहे. यात जीवनात अयशस्वी झाल्याचे सांगत, ‘माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये. वडिलांना आणि मुलीला सांभाळा…’ असा मजकूर लिहिला आहे; पण या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.