
खाऊच्या आमिषाने सहा वर्षांच्या बालिकेचे अपहरण करून अत्याचार व खून करणारा नराधम बंडा उर्फ प्रदीप पोवार (वय 28) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांनी तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. खोची (ता. हातकणंगले) येथे घडलेल्या या संतापजनक खटल्याकडे राज्याचे लक्ष लागले होते.
पीडित मुलीची ओळख व तिच्या घरी येणे जाणे असणारा आरोपी बंडा उर्फ प्रदीप पोवार याने 31 ऑक्टोबर 2021 रोजी खाऊचे आमिष दाखवून दुपारी 12.30 वाजता चिमुरडीचे अपहरण केले. निर्जन ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा निर्दयीपणे खून केला. या घटनेनंतर गावात यांचे संतप्त पडसाद उमटले होते.
याप्रकरणी पेठवडगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी महिनाभरात न्यायालयात 250 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. विशेष सरकारी वकील म्हणून ऍड. उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. 22 मार्च 2022 पासून खटल्याच्या कामकाजाला सुरुवात झाली. खटल्यात 13 तारखा झाल्या, 28 साक्षीदार तपासले. समोर आलेले पुरावे, साक्षी ग्राह्य धरून न्यायाधीश वृषाली जोशी यांनी आरोपी बंडा ऊर्फ प्रदीप पोवार याला दोषी ठरवून आज निकाल जाहीर केला. आरोपीच्या बाजूने ऍड. विश्वजित घोरपडे यांनी काम पाहिले.
दरम्यान, आज सकाळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांच्या न्यायालयात कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर हा खटला दुर्मिळातील दुर्मिळ नसल्याचे न्यायालयाने नमूद करून आरोपीला बालिकेचे अपहरण, अत्याचार, खून, पोक्सो कायदा यानुसार प्रत्येक कलमाखाली वेगवेगळ्या शिक्षा ठोठावल्या. आरोपीला तिहेरी जन्मठेप एकाचवेळी भोगावी लागणार आहे. तसेच, तीन कलमांमध्ये प्रत्येकी 10 हजार याप्रमाणे न्यायालयाने 30 हजार रुपये दंड सुनावला असून, दंडाची रक्कम पीडित बालिकेच्या आईला देण्याचे निकालात नमूद केले आहे. आरोपीला फाशी व्हावी, यासाठी बालिकेचे नातेवाईक शासनाकडे अर्ज करणार आहेत.






























































