नातेवाईकांनी आणलेला कपकेक खाल्ल्याने विषबाधा होऊन चिमुरड्या बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. श्रीयांश रणजित आंगज (वय – 4) व काव्या रणजित आंगज (वय – 7) अशी मृत्यू झालेल्या चिमुरड्यांची नावे आहेत. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे तालुक्यातील चिमगाव गावावर शोककळा पसरली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चिमगाव येथील रणजित नेताजी आंगज यांच्या घरी नातेवाईक मुलांना खाण्यासाठी कपकेक घेऊन आले होते. आंगज यांचा चार वर्षांचा मुलगा श्रीयांश व सात वर्षांची मुलगी काव्या यांनी केक खाल्ल्यानंतर त्यांना उलट्या होऊ लागल्या. उपचारासाठी त्यांना मुरगूडच्या खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मुलगा श्रेयांश अधिक अशक्त झाल्याने त्याचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. त्यानंतर दुपारी त्याचे चिमगाव येथे दफन करण्यात आले होते.
दरम्यान, मुलगी काव्या हिची प्रकृती खाल्यावल्यामुळे तिला अधिक उपचारासाठी मंगळवारी सायंकाळी कोल्हापूरच्या खासगी दवाखान्यात दाखल केले होते. पण उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. लहान बहीण-भावांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने चिमगाव ग्रामस्थ व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
मयत चिमुकल्यांचे वडील रणजित नेताजी आंगज पत्नी व मुलांसह पुण्यात राहात होते. कंपनीने त्यांना ब्रेक दिल्यामुळे ते आपल्या गावी सहा महिन्यांपासून राहण्यास आले होते. दोन्ही चिमुकल्यांच्या मृत्यूने आंगज कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
अन्न व प्रशासनाची दुकानात तपासणी
नातेवाईकांनी ज्या दुकानातून केक खरेदी केला त्या दुकानात जाऊन अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दुकानदाराकडून खाद्यपदार्थांविषयीची सखोल माहिती घेतली. यावेळी अन्न व प्रशासन खात्याच्या अन्न व औषध सहायक आयुक्त प्रदीपा पावडे, सहआयुक्त यू. एस. लोहकरे, अन्नसुरक्षा अधिकारी आर. पी. पाटील उपस्थित होते.
मंगळवारी दफन, आज पुन्हा उत्तरीय तपासणी
दरम्यान, बुधवारी विषबाधेतून मृत्यू झालेल्या श्रीयांशचा मृतदेह दफनभूमीतून जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला. मुरगूड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद माने व त्यांच्या पथकाने मृतदेहाची घटनास्थळीच उत्तरीय तपासणी केली. यावेळी पोलीस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, तहसीलदार अमरदीप वाकडे, कृषी अधिकारी संगीता शिंदे, तलाठी स्मिता शारबिद्रे, पोलीस पाटील किरण भाट, ग्रामसेवक बी. के. साठे, सरपंच दीपक आंगज उपस्थित होते.