शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा; कोल्हापुरात अभिषेक, मिरवणुका, युद्धकलेची प्रात्यक्षिके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५२वा राज्याभिषेक सोहळा जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक मिरवणुका, शिवरायांच्या मूर्तीवर अभिषेक, शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके आणि ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौक, निवृत्ती चौक आदी चौकांतील पुतळ्यांसह आकर्षक सजावटीमुळे संपूर्ण जिल्हा शिवमय झाला होता. शिवाय वृक्षारोपण तसेच रक्तदानासह विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी सर्व समाजाच्या सहभागातून कर्णकर्कश साऊंड सिस्टिमला फाटा देत पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.

पारंपरिक लवाजम्यासह मिरवणूक

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुढाकाराने मराठा स्वराज्य भवन ट्रस्ट व राजीं शाहू सलोखा मंचतर्फे सायंकाळी मंगळवार पेठेतील कार्यालयापासून पारंपरिक लवाजम्यासह भव्य मिरवणूक काढण्यात आली. कर्णकर्कश साऊंड सिस्टिमला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात, शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके आणि सामाजिक प्रबोधनाचे फलक झळकवत मिरवणूक काढण्यात आली. महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती घराण्याकडून शाही शिवराज्याभिषेक सोहळा

खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, याज्ञसेनी छत्रपती, महाराजकुमार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, यशराजे छत्रपती, तसेच राज परिवारातील सदस्य, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, संरक्षण दलातील अधिकारी, कर्मचारी, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये शाही लवाजम्यासह पारंपरिक वातावरणात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट, शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्ट आणि छत्रपती शाहू विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी हा सोहळा संपन्न झाला. पारंपरिक सनई-चौघड्यांचे सुमधुर स्वर, शाहिरी पोवाडे, विद्याथ्यांचे शौर्यगीतांचे सादरीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णमूर्तीवर करण्यात आलेला अभिषेक असा शाही सोहळा पार पडला. यावेळी पोलीस बॅण्ड आणि ‘करवीर गर्जना’ ढोल पथकाचे शानदार सादरीकरण करण्यात आले. यावेळी शाहीर विशारद आझाद नायकवडी यांच्या पोवाड्याने वातावरण भारून गेले होते. तसेच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचे व्याख्यान झाले.

पन्हाळ्यावर शिवसेनेकडून शिवराज्याभिषेक सोहळा

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि मोघलमदींनी महाराणी ताराराणी यांच्या पराक्रमाचा देदीप्यमान इतिहास लाभलेल्या ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावरील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ मूर्तीस शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून जलाभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख नामदेव गिरी, रविकिरण इंगवले, शहरप्रमुख विशाल देवकुळे, संयोजक दिनेश साळोखे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

‘आप’तर्फे रक्तदान शिबिर

महालक्ष्मी ब्लड बँक यांच्या सहकार्यान – आयोजित शिबिरात ५० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे हे सातवे वर्ष असल्याचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले. यावेळी उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, समीर लतीफ आदी उपस्थित होते.