
सामाजिक न्याय क्रांतीचे प्रणेते, आरक्षणाचे जनक, दिनदुबळ्यांचे कैवारी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 148 वी जयंती आज सर्वत्र ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरी करण्यात आली. समता दिंडीसह विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रमांतून अभिवादन करण्यात आले. लक्ष्मी-विलास पॅलेस या जन्मस्थळी वस्तुसंग्रहालय आजपासून लोकांना पाहण्यास खुले करण्यात आले.
यंदा छत्रपती शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी वर्ष असून, कृतज्ञता पर्व म्हणून छत्रपती शाहूंच्या कार्याचे स्मरण करण्यात येत आहे. आज 148 व्या जयंतीनिमित्तही भरगच्च उपक्रमातून जागर करण्यात आला. पूर्वसंध्येला ऐतिहासिक दसरा चौक येथील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह विविध पक्ष-संघटनांचे पदाधिकारी, शाहूप्रेमी तसेच शासकीय अधिकाऱयांकडून अभिवादन करण्यात आले.
दसरा चौक येथे समता दिंडीचे उद्घाटन श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. ऐतिहासिक बिंदू चौकात या दिंडीचा समारोप झाला. दिंडीत विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ, झांज, ढोल-ताशा, लेझीम आदी पारंपरिक कला सादर केली. एन.सी.सी., एन.एस.एस., स्काऊट गाईडचे विद्यार्थीही सहभागी झाले होते. छत्रपती शाहू महाराजांच्या वेशभूषेत उपस्थित मुलांनी लक्ष वेधले. चित्ररथात पारंपरिक वेषभूषेतून जिवंत प्रसंग सादर केले. पोवाडय़ातून राजर्षी शाहूंना आदरांजली वाहण्यात आली.
जन्मस्थळ लक्ष्मी-विलास पॅलेसचे संग्रहालय खुले
कसबा बावडा येथील लक्ष्मी-विलास पॅलेस हे राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येत आहे. येथील वस्तुसंग्रहालय आजपासून नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येत असून, या संग्रहालयास भेट देणारी प्रत्येक व्यक्ती राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांची स्फूर्ती घेऊन जाईल, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. लक्ष्मी-विलास पॅलेस येथे प्रशासनाच्या वतीने छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अभिवादन केले. यावेळी आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, इतिहास संशोधक डॉ. जयसिंग पवार, इंद्रजित सावंत, वसंत मुळीक आदी उपस्थित होते.
दुर्मिळ कागदपत्रे व छायाचित्रांचे प्रदर्शन
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सांस्कृतिक कार्यविभाग, पुराभिलेख संचालनालय व कोल्हापूर पुरालेखागार कार्यालयाच्या वतीने राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या जीवनपटावर आधारित दुर्मिळ कागदपत्रे व छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील व श्रीमंत शाहू छत्रपती महाराज उपस्थित होते.


























































