
देवणी तालुक्यातील सय्यदपूर येथील भाविक कोल्हापूर येथून देवदर्शन घेऊन परत येत असताना खटाव तालुक्यातील मल्हारपेठ – पंढरपूर राज्यमार्ग विळखे येथील देशमुख वस्तीनजीक वळणावर कार व दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वाराचा व कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला तर चारजण गंभीर जखमी अवस्थेत असल्याने त्यांना सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवार 27 जून रोजी दुपारच्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच देवणी तालुक्यातील सय्यदपूर येथे सोमवारी सकाळी मयताचे नातेवाईक, मित्र परिवार व ग्रामस्थ एकच गर्दी केली असून सय्यदपूर या गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत मायणी पोलीस दुरक्षेत्र व घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी की, देवणी तालुक्यातील सय्यदपूर येथील भाविक कोल्हापूर येथून देवदर्शन घेऊन परत येत असताना खटाव तालुक्यातील मल्हारपेठ – पंढरपूर राज्यमार्ग विळखे येथील देशमुख वस्तीनजीक वळणावर कार व दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात झाला.
या अपघातात दुचाकीस्वार सुरज राजाराम माळी (27, राहणार मानमोडी – मायणी तालूका खटाव) व कार मधील संतोष किशनराव बिरादार (40, राहणार सय्यदपूर तालूका देवणी) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात कारमधील राजकुमार बिरादार (25), ज्योतीराम धनाजी बिरादार (35), दत्ता बिरादार (32), महेश विठ्ठलराव जळकोटे (24, सर्व राहणार सय्यदपूर ता.देवणी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना मायणी येथे आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून सातारा येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी गोसावी हे करीत आहेत.



























































