
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मराठी माणसाला कमी लेखणारे आणि मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने राज्यात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात आता ‘कोल्हापुरी पायताण’ दाखवावे लागेल, अशा शब्दांत राज्यपालांवर संताप व्यक्त करताच, कोल्हापुरातील शिवसैनिकांनी भले मोठे कोल्हापुरी पायताण दाखवून राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. यावेळी ‘हिंदू धर्मात फूट पाडणारे…झोपेतून उठलेल्या राज्यपालांचा धिक्कार असो…’ ‘चले जाव… चले जाव… राज्यपाल चले जाव’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.
ऐतिहासिक मिरजकर तिकटी परिसरात संतप्त शिवसैनिकांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांना भलेमोठे कोल्हापुरी पायताण दाखवून त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. यावेळी कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, विजय देवणे, संजय पवार यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्राला इतिहास आणि भूगोल आहे हे ध्यानात ठेवा – हर्षल सुर्वे
आजपर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्राला लाभलेले हे राज्यपाल अत्यंत दुर्दैवी असल्याच्या संतप्त प्रतिक्रियाही उमटल्या. ‘राज्यपाल’ या घटनात्मक पदावर आहात म्हणून आपल्या पदाचा सन्मान करतो, त्यामुळे राज्यपालांनी राज्य कारभार पाहावा, राजकारण करू नये. त्यांना राजकारण करायचेच असेल तर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा देऊन त्यांच्या पक्षातून राजकारण करावे. त्यावेळी त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. ‘अहद तंजावर तहत पेशावर’ मराठय़ांनी राज्य केल्याचा इतिहास आणि तसा भुगोल आहे, अशा शब्दांत हर्षल सुर्वे यांनी राज्यपालांना ठणकावले आहे.
राज्यपालांवर गुन्हा दाखल करा – संजय पवार
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. तशी शिकवणही दिली नाही. त्यामुळे आजपर्यंत या महाराष्ट्रात गुजराती, मारवाडी आदी विविध समाजांतील समाजबांधव गुण्यागोविंदाने येथे पिढय़ान्पिढय़ा वास्तव्य, व्यवसाय करत आहेत; पण सध्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यातून दोन भाषिकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यपालांवर कलम 153, 153अ अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली.
महाराष्ट्राच्या परंपरेचे भान असणारी व्यक्ती नेमा – संभाजीराजे छत्रपती
राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो; अथवा मुंबईबद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत. त्यामुळे राष्ट्रपती व पंतप्रधानांनी तत्काळ या विषयात लक्ष घालून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारी व्यक्ती राज्यपाल म्हणून नियुक्त करावी, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
राज्यातील बंधुभावाचे वातावरण बिघडवण्याचे काम – बाळासाहेब थोरात
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची अस्मिता आहे. राज्यपाल हे पद घटनात्मक आहे. ते राज्याचे पालक असतात. त्यांनी कायम एकात्मतेचे व चांगले वातावरण राहील यासाठी वक्तव्ये केली पाहिजेत. परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रातील राज्यपालांनी सातत्याने चुकीची वक्तव्ये करून राज्यातील व देशातील बंधुभाव बिघडवण्याचे काम केल्याची टीका आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

































































