आता चहा प्यायचा अन् कप खायचा, कोल्हापूरच्या इंजिनीअर त्रिकूटाने बनवले पर्यावरणपूरक बिस्किट कप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

’चहा प्या अन् कप खाऊन टाका’ असं कुणी म्हटलं तर नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरंय. प्लॅस्टिक कपमुळे रस्त्याच्या आजूबाजूला मोठय़ा प्रमाणात होणाऱया कचऱयापासून सुटका करण्यासाठी कोल्हापूरच्या इंजिनीअर त्रिकुटाने पर्यावरणपूरक बिस्किट कपची निर्मिती केली आहे. त्यांची ही कल्पना सर्वांच्या पसंतीस उतरत आहे.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लॅस्टिक कपला पर्याय म्हणून दिग्विजय गायकवाड, आदेश कारंडे आणि राजेश खामकर या इंजिनीअर तरुणांनी मिळून मॅग्नेट एडिबल कटलरी ब्रँड या कंपनीची सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत झीरो वेस्ट या तत्त्वावर त्यांनी बिस्किट कपची निर्मिती केली आहे. हे कप परवडणाऱया किमतीत असल्याने कोल्हापुरातील चहाचे स्टॉल्स, पँटिन, हॉटेल्स अशा विविध ठिकाणी आता हे कप पाहायला मिळतायत.

आंध्रप्रदेश, केरळ, हैद्राबादमध्ये एडिबल कपची संकल्पना पूर्वीपासूनच आहे. हे कप आपल्या राज्यात तयार व्हावेत अशी आमची इच्छा होती. मी दीड वर्षे त्यावर अभ्यास केला. कप निर्मितीसाठी सध्या आम्ही हैद्राबादवरून मशीन मागवली असली तरी भविष्यात आम्ही स्वतःच मशीन्सची निर्मिती करणार आहोत. बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देण्याचीही आमची तयारी आहे. – दिग्विजय गायकवाड, मेकॅनिकल इंजीनिअर

खाण्याजोग्या प्लेट्सचीही करणार निर्मिती

बिस्किट कप तयार करण्यासाठी मैदा, साखर, का@र्नफ्लॉवर आणि कोको पावडरचा वापर केला जातो. या कपमध्ये 15 मिनिटांपर्यंत चहा सुस्थितीत राहू शकतो. भविष्यात खाण्याजोग्या प्लेट्स आणि बाऊल्स तयार करण्याची त्यांची योजना आहे. सध्या या मशीन्सवर काम सुरू असून दिवाळीपर्यंत प्लेट्स बाजारात येतील असे दिग्विजय सांगतो.