
गेल्या तीन-चार दिवसांपासून जिह्यात पावसाची रिपरिप सुरू असून, वेधशाळेने 20 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट, 21 व 22 जुलै रोजी रेड अलर्ट आणि 23 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. या कालावधीमध्ये अतिपाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिह्यातील चंदगड, आजरा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, भुदरगड या तालुक्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाचे आगमन झाले असून, सर्वत्र अधूनमधून रिपरिप सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पातळीतही चांगलीच वाढ झाली असून, पंचगंगेसह सर्वच नद्यांचे पाणी पात्रालगत आले आहे. पावसाचा जोर वाढल्यास कोणत्याही क्षणी नद्यांचे पाणी दुसऱयांदा पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. सकाळी 7 च्या सुमारास पंचगंगेची पातळी 26 फूट 8 इंच होती. सायंकाळी 6 वाजता 26 फूट 10 इंच पाणीपातळी झाली होती.
पंचगंगा नदीवरील – शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ; भोगावती नदीवरील – हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडग कोगे; कासारी नदीवरील – यवलूज; वेदगंगा नदीवरील – वाघापूर व निळपण; दूधगंगा नदीवरील – दत्तावाड असे एकूण 15 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
गेल्या 24 तासांत जिह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 51.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. राधानगरी धरणात 131.44 दलघमी पाणीसाठा असून, धरणाच्या सिंचन विमोचकातून 1 हजार 350 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.






























































