कोल्हापूर झेडपीत स्वयंपाकी, मदतनीस मानधन घोटाळा; कंत्राटी डाटा ऑपरेटर संशयाच्या फेऱ्यात; लेखाधिकारी नामानिराळा

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शालेय पोषण आहार योजनेत काम करणाऱया स्वयंपाकी व मदतनीसांच्या मानधनातील घोटाळ्याचा खळबळजनक प्रकार गेल्या काही दिवसांपासून जिह्यात चर्चेत आहे. एका कंत्राटी डाटा ऑपरेटर महिलेने पती, सासू, भाऊ, भावाचा मित्र यांच्या खात्यावर या मानधनाची रक्कम परस्पर वर्ग करून सुमारे 23 लाखांचा घोटाळा केल्याची चर्चा होत असली, तरी गेल्या तीन वर्षांत झालेला हा प्रकार पाहता, हा घोटाळा 50 लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

संबंधित त्या डाटा ऑपरेटर महिलेच्या पतीने रागाच्या भरात लेखाधिकाऱयाचे अपहरण करून केलेल्या मारहाणीमुळे याला वेगळे वळण लागल्याचेही गंभीर आहे. अधिकाराचा गैरवापर करीत त्या लेखाधिकाऱयाकडून पत्नीला सातत्याने करण्यात येणारे व्हॉट्सऍपवरून कॉल्स, बैठकीच्या नावाखाली पुणे येथे घेऊन जाणे, हॉटेलचा भलताच प्रयोग ते बायको घरी नसताना घरी बोलाविण्यासह कामाच्या नावाखाली कार्यालयात रात्री उशिरापर्यंत थांबवून लगट करण्याचा प्रकार अशा अनेक चर्चा आता जिल्हा परिषदेच्या आवारात होत आहेत. या दुसऱया बाजूचाही निष्पक्षपातीपणे तपास झाला तरच हा अपहार कोणी केला आणि त्याचा खरा उद्देश व चेहरा समोर येणार आहे.

जिल्हा परिषदेत मार्च 2021 या आर्थिक वर्षापासून डाटा एण्ट्री ऑपरेटर शालेय पोषण आहार म्हणून कंत्राटी पद्धतीने नेमणुकीस असलेली ही महिला संबंधित लेखाधिकाऱयाच्या देखरेखीखाली आजपर्यंत काम करीत आहे. कायमस्वरूपी नोकरी लावण्यासह कौटुंबिक माहितीतून जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न त्या लेखाधिकाऱयाकडून झाला. डिसेंबरमध्ये पुणे येथील शासकीय बैठकीच्या निमित्ताने घेऊन जात हॉटेलमध्ये भलत्याच उद्देशाने घेऊन जाण्यासह त्यानंतर बायको घरी नसल्याचे सांगून एकटीला घरी घेऊन जाण्याचाही प्रयत्न फोल ठरला. अखेर हा भलताच प्रकार सुरू असल्याचे डाटा ऑपरेटरच्या घरात समजताच पती आणि त्याच्या मित्रांनी त्या लेखाधिकाऱयाला गाठून मारहाण केली. पण हा डाव त्यांच्यावरच उलटला असला, तरी हे घोटाळ्याचे प्रकरण भलतेच असल्याचे दिसून येऊ लागले आहे.

वाईट नजरेने नियोजनबद्ध घोटाळा?

लेखाधिकाऱयाने सांगितल्यानुसार ‘त्या’ डाटा ऑपरेटरने पती, सासू, भाऊ, भावाचा मित्र यांच्या खात्यावर शालेय पोषण आहार योजनेत काम करणाऱया स्वयंपाकी व मदतनीसांच्या मानधनाची रक्कम आतापर्यंत वर्ग केली. नातेवाईकांच्या खात्यात जमा झालेली ती रक्कम वेळोवेळी काढून लेखाधिकाऱयाकडे जमा केली; पण याची नोंद नसल्याने साहजिकच डाटा ऑपरेटरवर संशय बळावत असला, तरी लेखाधिकाऱयाच्या संमतीशिवाय पैसे वर्ग होत नसतील तर कित्येक महिने चाललेल्या या गैरप्रकाराला लेखाधिकारी जबाबदार का नाही? असा सवालही निर्माण होत आहे. एकंदरीत पद्धतशीरपणे केलेल्या या घोटाळ्यातील आवाक्यात नसलेल्या लाखोंच्या रकमेमुळे नाइलाजाने लेखाधिकाऱयाची ‘ती’ वाईट नजर यशस्वी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

‘तो’ पोलीस अधिकारी कोण?

आपली आणि आपल्या कुटुंबीयांची झालेली फसवणूक लक्षात येताच संबंधित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांना पोलीस ठाण्यात थांबवून ठेवले; पण तक्रार दाखल न करताच परत पाठविले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे अर्ज करताच दोन तासांत संबंधित महिलेला पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले; पण जिल्हा परिषदेमधील ‘विशाखा समिती’कडे जाण्याचा सल्ला देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न होताना दिसून आला. शिवाय त्या लेखाधिकाऱयावर गुन्हा दाखल होऊ नये, तसेच त्याला मारहाण करणाऱयांवर मात्र गुन्हे दाखल करायला लावणारा तो पोलीस अधिकारी कोण? त्याचा या प्रकरणाशी काय संबंध? असे सवालही निर्माण झाले आहेत.