>> डॉ. मनोहर देसाई
महाराष्ट्राचा स्वतच्या अस्सल पेहरावासोबत पादत्राणांचीही ओळख आहे. ‘कोल्हापुरी चप्पल’ ही महाराष्ट्राची रांगडी ओळख तिच्यातील खास वैशिष्टय़ांमुळे सर्वदूर पसरलेली आहे.
एखाद्या व्यक्तीच्या पेहरावाबरोबरच पादत्राणेसुद्धा आता खूप महत्त्वाची झाली आहेत. एकेकाळचा पादत्राणे हा तसा दुर्लक्षित विषय. पायात काहीबाही घालून सहज कामावर निघून जाणे खपून जायचे. आता मात्र काळ बदलला आहे, पादत्राणे हीसुद्धा एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख म्हणून ग्राह्य धरली जाऊ लागली आहे. रणरणत्या उन्हात आपल्या पायांना संरक्षण मिळावे म्हणून पायाच्या तळव्यांवर झाडाची पाने किंवा जाड साली बांधून मानवाने पादत्राणे तयार करायला सुरुवात केली. पुढे मेलेल्या जनावरांच्या चामडय़ाचा उपयोग पायाच्या तळव्यांना खडी आणि काटे टोचू नयेत तसेच उन्हापासून बचाव करण्यासाठी बांधून चामडय़ाच्या चपलेची मुहूर्तमेढ झाली. चपला बनवण्यासाठी विशिष्ट कारागीर आपले कसब दाखवत आपापल्या प्रांतामध्ये पादत्राणे तयार करू लागले व त्यांच्या कलाकुसरीनुसार त्यांच्या चपलांकरिता मागणी वाढली. त्याचप्रमाणे या कारागीरांच्या प्रांतानुसार त्यांच्या चपलांना त्यांच्या प्रांताचे नाव जोडले गेले. कोल्हापुरी चपलेचा इतिहाससुद्धा अगदी तसाच आहे. बाराव्या शतकामध्ये कोल्हापूरमध्ये या व्यवसायाला त्यावेळच्या राजांनी प्रोत्साहन दिले. तेराव्या शतकात कोल्हापुरी चपला ही एक वेगळी ओळख सर्वदूर पसरली. कोल्हापूरचे प्रथम शाहू महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी यांनीसुद्धा या चपला तयार करणाऱया कारागीरांना प्रोत्साहन दिले व चपला तयार करण्याच्या कारखान्यांची विविध केंद्रे कोल्हापुरात सुरू झाली.
पूर्वीच्या मराठी सिनेमांमध्ये एखादे रांगडे व्यक्तिमत्त्व दाखवताना त्यांच्या पायात कोल्हापुरी चप्पल असे. ‘कर्र…कर्र’ असा आवाज करणाऱया चपला घालून एखादे पात्र सर्वांचे लक्ष वेधून घेत असे. गावचे पाटील, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या पायातील कोल्हापुरी वहाणा ही त्यांची व्यक्तिमत्त्वे रंगवताना एक महत्त्वाची वस्तू असे. मराठी चित्रपटसृष्टीतील चंद्रकांत आणि सूर्यकांत मांढरे या रांगडय़ा आदरणीय कलाकार व्यक्तिमत्त्वांच्या पायातील कोल्हापुरी चपला त्यावेळच्या तरुणाईचे आकर्षण ठरल्या. कोल्हापुरी चपला या तशा खूपच मजबूत. बऱयाचदा एखाद्यावरील राग काढताना “तुला चपलेनी फोडून काढीन, माझ्या पायातलं कोल्हापुरी पायतान पाहिलंस का?” अशी वाक्यं वापरात असायची. आज काळ पुढे सरकला आणि पादत्राणे प्रकारात अनेक कंपन्या पुढे आल्या. चामडय़ाचा तुटवडा आणि नव्या पिढीची बदललेली मागणी यामुळे कोल्हापुरी चपलांची आवक काही प्रमाणात कमी झाल्याचेसुद्धा काही व्यापारी सांगतात, परंतु काही व्यापारी त्याच्या अगदी उलट सध्या तरुणाईला कोल्हापुरी चपलांचे वेड लागले आहे व जगभर आमच्या चपलांना मागणी असल्याचे आवर्जून सांगतात. 2019 च्या जुलैमध्ये कोल्हापुरी चपलांना जिओ टॅग पेटंट मिळाले. त्यामुळे अशा प्रकारची चप्पल बनवणाऱया कोल्हापूरजवळच्या इतर गावांमधील चपलांनासुद्धा आता ‘कोल्हापुरी चप्पल’ असा
टॅग लावून त्या सर्वांना उपलब्ध होत आहेत.
कोल्हापुरी चप्पल तयार करण्यासाठी लागणारे चामडे किंवा चपलांचे रंग हे नैसर्गिक भाजीपाला वापरून तयार केले जातात. पूर्णत हाताने तयार केलेली ही चप्पल मध्यभागी पायाला घट्ट धरणारा चामडय़ाच्याच डिझाइनचा पट्टा, तर अंगठय़ापासून त्या रुंद पट्टय़ाला जोडलेली चामडय़ाच्या वेणीची पट्टी. पायाच्या अंगठय़ाला योग्य पकड देणारी पट्टी आणि मधल्या पट्टीवर रुबाबदार असा गोंडा. चपलांच्या उंचीमध्ये सध्या विविधता पाहायला मिळते. जसे काही ग्राहक हे त्यांना टाचा उंच हव्या आहेत व त्याप्रमाणे ते कारागीराकडे तशा पद्धतीच्या चपलांची मागणी करतात. काही ग्राहक “कोल्हापुरी कर्र कर्र आवाज करणारी चप्पल द्या” अशा पद्धतीनेच मागणी करतात. कोल्हापुरी चपलांना पूर्वी ‘खास कोल्हापुरी’, ‘खास कुरुंदवाडी’, ‘खास कापशी’, ‘गांधीवादी’ अशी नावेसुद्धा वापरली जात. हिंदी चित्रपटसृष्टीतील काही नावाजलेल्या चित्रपटांची नावेसुद्धा काही कारागीरांनी आपल्या चपलांना दिली. जसे गाजलेले चित्रपट ‘सुरक्षा’, ‘सिलसिला’, ‘सुहाग’, ‘जंजीर’, ‘नाचे मयुरी’, ‘दिल’, ‘मेरी आवाज सुनो’, ‘महाराजा’, ‘महाभारत’ इत्यादी. कोल्हापुरी चप्पल पूर्णत चामडय़ाची असल्यामुळे उन्हाळ्यात जमिनीपासून येणारी उष्णता ती रोखून धरते. सपाट कोल्हापुरी चपलांना देशात आणि परदेशात खूप मागणी आहे.
जसजशी नवीन पिढी या व्यवसायात प्रवेश करत आहे तसतसे यातील कामाच्या पद्धतीमध्येसुद्धा आमूलाग्र बदल होत आहेत.नवनवीन यंत्रसामुग्रीचा उपयोग चप्पल तयार करण्यासाठी होत आहे. पूर्वी एक चप्पल करण्यासाठी किमान चार आठवडे लागायचे. पण आज ती चप्पल विविध यंत्रे वापरून लवकर तयार करता येते. फिनिशिंगसाठीसुद्धा आता मशीनचा वापर केला जातो. सध्या या व्यवसायात चामडय़ाची टंचाई असल्यामुळे निर्मितीमध्ये खूपच घट झाली आहे. त्याचप्रमाणे चामडय़ाच्या किमतीसुद्धा आता वाढल्या आहेत. देशात आणि परदेशात होणाऱ्या विविध कला प्रदर्शनांमधून अनेक स्टॉल लागतात आणि त्यामध्ये कोल्हापुरी चपलेचा स्टॉल हा एक वेगळे आकर्षण असतो. स्वित्झर्लंड, अमेरिका, युरोप, इजिप्त, इटली व इतरही अनेक देशांमधून कोल्हापुरी चपलांना खूप चांगली पसंती आहे.
एखाद्या व्यक्तीचे साधे किंवा ग्रामीण भागातील व्यक्तिमत्त्व उभे करण्यासाठी कोल्हापुरी चपलांची निवड केली जाते. दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील नेते जेव्हा आपल्या मिश्यांवर ताव मारतात, तेव्हा महाराष्ट्रीय बाणा दाखवणारा त्यांच्या चपलांमधून ‘कर्र कर्र’ आवाज येतो. या नेत्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक रुबाबदार हेते जेव्हा ते अंगावर कडक खादीचे कपडे आणि पायात कोल्हापुरी चपलांचा साज चढवतात.
पुरुषांसाठी, स्त्रियांसाठी आणि लहान मुलांसाठीसुद्धा वेगवेगळ्या डिझाइनमध्ये कोल्हापुरी चपला उपलब्ध आहेत. कोल्हापूरला जाणारा प्रत्येकजण स्वतसाठी व कुटुंबातील इतर सदस्यांसाठी कोल्हापुरी चपला आवर्जून खरेदी करतो. प्रत्येक राज्याची स्वतची काहीतरी वेगळी ओळख आहे. त्या-त्या राज्यांनी त्यांच्या पोशाख आणि पादत्राणे याबाबत तडजोड केलेली दिसत नाही. राजस्थानातून किंवा गुजरात, मध्य प्रदेश येथून आलेले अनेक पोशाख व पादत्राणे महाराष्ट्रातील विविध विवाह सोहळे आणि कार्पामांमध्ये मिरवताना दिसतात. महाराष्ट्राचा शाही फेटा, पेहराव आणि महाराष्ट्राचे वैभव असणाऱया ‘कोल्हापुरी चपले’चा नवीन पिढीने आवर्जून वापर सुरू करावा. महाराष्ट्राचा पेहराव आणि पादत्राणांची ही ओळख पुन्हा एकदा उदयाला यावी. ‘कोल्हापुरी चप्पल’ ही तर आपल्या राज्याची ओळख म्हणून प्रत्येकाने अवश्य परिधान करावी. कोल्हापुरी चपलांना पुन्हा एकदा सुवर्णवैभव प्राप्त व्हावे आणि या पादत्राणांची उलाढाल जगभर व्हावी हीच सदिच्छा!