
कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानदारांमार्फत रेशन कार्डधारकांना मोफत धान्यावर देण्यात येणारे गेल्या चार महिन्यांचे आठ कोटींचे अनुदान थकले आहे. त्यामुळे दुकानदार हवालदिल झाले आहेत. दिवाळीपूर्वी ही कमिशनची थकीत रक्कम मिळावी, तसेच ‘आनंदाचा शिधा’ पुन्हा सुरू करावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रास्त भाव रेशन धान्य दुकानदार महासंघाकडून जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान, चव्हाण यांनी वित्तीय विभागाशी संपर्क साधून माहिती घेतली असता, आठ दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गरिबांचा सण गोड व्हावा यासाठी राज्य शासनाकडून ‘आनंदाचा शिधा’ सुरू होता. पण यंदा गणेशोत्सवात हा शिधा मिळाला नाही. आता तर दिवाळीलाही हा शिधा मिळणार नसल्याचे समोर येत आहे. हा शिधाच आता बंद करण्यात आल्याने, गरिबांना दिलासा देणारा हा शिधा पुन्हा सुरू करावा, तसेच दिवाळीपूर्वी जून ते सप्टेंबरपर्यंतचे मोफत धान्यवाटपाची कमिशनची रक्कम त्वरित द्यावी, ‘ई-पॉस’ मशीनच्या तांत्रिक अडचणी व पावसामुळे सप्टेंबरच्या धान्यापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना मुदतवाढ देऊन धान्य वाटपाची परवानगी द्यावी, तेल-साखर आदी जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात सर्व रेशन दुकानात राज्य सरकारने उपलब्ध करून द्यावेत, आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या. जिल्हा रास्त भाव रेशन धान्य दुकानदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र मोरे यांच्यासह राजेश मंडलिक, दीपक शिराळे, गजानन हवालदार, अशोक सोलापुरे, सरिता हरुगुले आदी पदाधिकारी उपस्थित होते.