कोल्हापूर उत्तरसाठी महाविकास आघाडी, भाजपचे अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी आज काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर विरोधात भाजपचे सत्यजित कदम यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनावर भर देत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दोन्ही बाजूंच्या नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी प्रचाराचा धुरळा उडाला.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी 12 एप्रिल रोजी मतदान, तर 16 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या अंतिम दिवस असल्याने प्रमुख उमेदवारांनी आजच अर्ज दाखल करण्यावर भर दिला. महाविकास आघाडीच्या वतीने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर भाजपकडून 2014चे काँग्रेसचे पराभूत उमेदवार सत्यजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, जाधव यांनी साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांच्याकडे दाखल केला. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

दुसरीकडे भाजपचे उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी ऐतिहासिक दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भाजपच्या वतीने रॅली काढण्यात आली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, राहुल चिकोडे, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार अमल महाडिक आदीसह भाजप व मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मी मूर्ख राजकारणी नाही – चंद्रकांत पाटील

विधानपरिषदेच्या दोन जागा बिनविरोध करून तीन जिल्ह्यांचे पैसे वाचवले. त्यामुळे कोल्हापूर उत्तरची निवडणूकही बिनविरोध काढतील, असे त्यांना वाटत असेल तर मी वेडा आहे का? तुमची विधानपरिषद बिनविरोध काढली. मात्र, मी मूर्ख राजकारणी नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना लागावला. शिवाय, बंटी पाटील हा ‘माणसं खाणारा माणूस’ असल्यामुळे शिवसैनिकांनी सावध राहावे, अशा शब्दांत त्यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका केली.

चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला – सतेज पाटील

तीन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनीच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळेच शिवसेनेच्या आमदारांचा पराभव झाल्याचे संपूर्ण जिह्याने बघितल्याचा पलटवार पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. दरम्यान, कोल्हापूरकरांचा कल पाहता या पोटनिवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूनेच लागणार हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. येथे निवडणूक लढविण्याचा निर्णय चुकल्याचे आता चंद्रकांत पाटील यांच्याही लक्षात आले आहे. त्यामुळेच ते आपल्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करत असल्याचेही सतेज पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.