Lok Sabha 2019 तृणमूलतर्फे 40 टक्के महिलांना लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। कोलकाता

ओडिशामधील लोकसभेच्या एकूण जागांपैकी 33 टक्के जागांवर महिलांना उमेदवारी देण्याची घोषणा बिजू जनता दलाचे (बीजेडी) अध्यक्ष नवीन पटनायक यांनी दोन दिवसांपूर्वी करताच त्यांच्या पावलावर पाऊल टाकत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आपल्या पक्षातर्फे आगामी लोकसभा निवडणुकीत प. बंगालमधून 40.05 टक्के महिलांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. तृणमूलतर्फे मंगळवारी लोकसभेच्या 42 उमेदवारांची घोषणा केली असून त्यामध्ये महिलांना लोकसभेसाठी प्रथमच अधिक संख्येने उमेदवारी मिळाली आहे.

ओडिशात लोकसभेच्या 21 जागा आहेत. त्यापैकी 7 जागांवर बीजेडी महिलांना उमेदवारी देणार आहे. यानंतर मंगळवारी तृणमूल काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत महिलांना राज्यातून लोकसभा निवडणुकीत तब्बल 40.05 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आजच ज्येष्ठ अभिनेत्री मुनमुन सेन (असनसोल), सताब्दी रॉय (वीरभूम) यांची लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूलने उमेदवारी घोषित केली आहे. लोकसभेसाठी 40.05 टक्के जागांवर महिला उमेदवार देणे हा अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

तृणमूलने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत ज्यांची नावे नाहीत त्यांच्याकडे पक्षाची जबाबदारी सोपवली जाईल, असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.

तृणमूल काँग्रेस यावेळी लोकसभेची निवडणूक पं. बंगालबरोबरच ओडिशा, आसाम, झारखंड, बिहार आणि अंदमानमधूनही लढविणार आहे.