
सामना ऑनलाईन। कोलकाता
लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने आणि भाजपच्या जागा वाढल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चांगल्याच चवताळल्या आहेत. अपेक्षित यश न मिळाल्याचा वचपा काढण्यासाठी आणि आरएसएसचा प्रभाव कमी करण्यासाठी दीदींनी तृणमूल काँग्रेसच्या 2 नव्या संघटना स्थापन केल्या आहेत.
टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी नुकतीच एक गुप्त बैठक घेण्यात आली. यावेळी ममता दीदींनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूलच्या दोन संघटना करण्यात येणार असल्याचे सांगितले. ‘जय हिंद वाहिनी’ आणि ‘बंग जननी वाहिनी’ अशी त्यांना नावे देण्यात आली आहेत. ममता यांचा भाऊ कार्तिक बॅनर्जी यांच्यावर जय हिंद वाहिनीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर ममता यांचा दुसरा भाऊ गणेश बॅनर्जी यांना संयोजक बनवण्यात आले आहे. तर दुसऱ्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून खासदार काकोली घोष दस्तीदार यांची नेमणूक करण्यात आली आहे.
भाजप राज्यात अस्थिरता निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे असा ममता बॅनर्जी सातत्याने आरोप करत आल्या आहे. भाजपला अडचणीत आणण्यासाठी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या भाजप नेत्यांच्या नावाची यादीच ममता बॅनर्जी यांनी मागवली आहे. भाजपने तृणमूल काँग्रेसची काही कार्यालये बळकावली असल्याचा आरोप ममता बॅनर्जींच्या पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. ही कार्यालये परत मिळवा असे आदेशही दीदींनी दिल्याचे एका कार्यकर्त्याने सांगितले आहे.
























































