IPL 2023 हॅटट्रिकसह चेन्नई टॉपवर कोलकात्याचा 49 धावांनी पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजिंक्य रहाणेच्या 29 चेंडूंतील नाबाद 71 धावा आणि डेव्हन कॉन्वे- शिवम दुबे यांच्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर चेन्नईने उभारलेल्या 235 धावांचा पाठलाग करण्यात कोलकाता अपयशी ठरली. जेसन रॉय (61) आणि रिंकू सिंहच्या (ना. 53) दमदार खेळय़ानंतरही कोलकाता 8 बाद 186 अशीच मजल मारू शकला आणि चेन्नईने विजयाची हॅटट्रिक करत आयपीएलच्या गुणतालिकेत दहा गुणांसह अव्वल स्थान पटकावले. आजच्या सामन्यात चेन्नईकडून 18 षटकारांचा आणि 14 चौकारांचा तर कोलकात्याकडून 12 षटकार आणि 14 चौकारांचा वर्षाव केला गेला.

चेन्नईच्या 236 धावांचा पाठलाग करताना जेसन रॉयने 19 चेंडूंत पन्नाशी गाठताना 29 चेंडूंत 71 धावा काढल्या. यात 5 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. जेसन रॉय आणि रिंकू सिंहने विजयासाठी प्रयत्न केले, पण ही जोडी फुटल्यानंतर रिंकू सिंह फार काही करू शकला नाही. त्याने 4 षटकार आणि 3 चौकार खेचत नाबाद 53 धावा केल्या.

तत्पूर्वी, कोलकात्याने नाणेफेक जिंकली आणि परंपरेप्रमाणे प्रथम क्षेत्ररक्षण केले. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हन कॉन्वेने पहिल्या चेंडूपासूनच फटकेबाजी सुरू केली. 7.3 षटकांत 73 धावांची सलामी दिल्यावर ऋतुराज 35 धावांवर बाद झाला. आज शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणेने डोळ्याचे पारणे फेडणारी उत्तुंग फटकेबाजी केली. शिवमने 20 चेंडूंत 5 षटकार आणि 2 चौकार ठोकत अर्धशतक साजरे केले तर 24 व्या चेंडूवर 50 धावा पूर्ण केल्या. त्याने आपल्या 29 चेंडूंच्या खेळीत 5 षटकार आणि 6 चौकार लगावत 71 धावा ठोकल्या. कॉन्वेनेही 40 चेंडूंत 56 धावा चोपून काढल्या. या चार घणाघाती खेळींमुळेच चेन्नईने कोलकात्यासमोर 236 धावांचे जबरदस्त आव्हान उभारले. कोलकात्याकडून कुलवंत खेजरोलियाने 2 विकेट घेतल्या.