
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील 10 विद्यार्थी आणि दोन प्राध्यापक ऑस्ट्रेलिया येथील सिडनीस्थित वेस्टर्न सिडनी विद्यापीठात दाखल झाले आहेत. त्यांचा एक महिन्याचा अभ्यासदौरा असून प्रगतशील कृषी तंत्रज्ञान आणि कृषी उद्योजकता विकास या बाबतीतील धडे गिरवायला त्यांनी सुरुवात केली आहे.
विद्यापीठ राबवत असलेल्या भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली संचलित राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाच्या अंतर्गत परदेश प्रशिक्षण घेणारी ही पहिली तुकडी आहे. कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रकल्पप्रमुख तथा शिक्षण संचालक डॉ. प्रशांत बोडके यांच्या नेतृत्वात या प्रशिक्षणाची उत्साहात सुरुवात झाली आहे. त्यांच्यासह आणखी दोन प्राध्यापक डॉ विनायक पाटील व डॉ वैभव राजे महाडिक हे विद्यार्थ्यांसोबत अध्ययन करत आहेत तर नंतर डॉ भावे , डॉ. बोडके, डॉ सावर्डेकर व डॉ परूळेकर हे काही दिवसांनी या ठिकाणी दाखल होऊन विद्यापीठ स्तरावरील एकत्रित शिक्षण आणि संशोधन कार्यक्रमांचे नियोजन करणार आहेत.
या विद्यार्थ्यांचे ऑस्ट्रेलियात आणि खास करून सिडनीत स्थायिक झालेल्या मराठी कुटुंबांनी मोठ्या आस्थेने स्वागत केले आहे. प्रथमच देशाबाहेर पडलेले हे विद्यार्थी महाराष्ट्राबाहेर सुद्धा क्वचितच गेलेले आहेत. त्यामुळे या प्रगत राष्ट्रात राहताना नवीन वातावरणाशी, संस्कृतीशी जुळवून घेताना थोड्या अडचणी येणे साहजिक आहे. मुलांची राहण्याची व प्रवासाची उत्तम सोय कोकण कृषी विद्यापीठाने केली आहे. तथापि इथली खाद्यसंस्कृती वेगळी असल्याने विद्यार्थी ते राहत असलेल्या घरातच आपल्या पाककृती एकत्रितपणे करून स्नेहभोजनाचा आनंद घेत आहेत. प्रथमच परदेशात आपल्या कुटंबाशीवाय राहत असल्याने आईच्या जेवणाची आठवण येतेच. त्यामुळे विद्यापीठाने पुरेसे विद्यावेतन दिलेले असूनही आईचे घरगुती जेवणाची सर नाही. पण ही उणीव ही सिडनी स्थित मराठी कुटूंबानी आई वडीलांची जागा घेत या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रीयन घरगुती जेवण देण्यासाठी सगळयांनी पाहुणचारच्या आमंत्रणाचा वर्षाव केला आहे.
नुकतेच मूळचे चिपळूण येथील व्यावसायिक आणि ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेले संगीता व तुषार भोसले यांच्या घरी मुलांनी पहिला पाहुणचाराला रात्रीच्या भोजनाचा आस्वाद घेतला. शिवाय मुलांशी अनौपचारिक गप्पा मारून त्यांच्या या देशाविषयीच्या ज्ञानात भर घातली. आपल्या घरापासून इतक्या दूर घरातच असल्यासारखा अनुभव येत असल्याने विद्यार्थी अतिशय आनंदी व समाधानी आहेत. या सर्व उपक्रमांचे आयोजन नीलिमा व प्रशांत बेर्डे, प्रिया आणि सौदामिनी या भगिनी, तसेच माधवी व मनीष नानावटी यांनी पुढाकार घेऊन केले आहे. मुलांच्या घराचे भाडे ऑस्ट्रेलियन डॉलर्समध्ये भरणे (रुपयांचे डाॅलर्स रूपांतरीत करणेसाठी सहकार्य करणे) असो किंवा त्यांच्या स्थानिक सहली आयोजित करणे असो, अर्थाअर्थी काही संबंध नसलेली ही कुटुंबे वसुधैव कुटुंबकम या जीट्वेंटी वर्षाच्या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत आहेत. सिडनीतील या सर्व कुटुंबीयांचे,विद्यापीठाने, विद्यार्थ्यांच्या पालकांनी व विशेषतः या यजमान कुटुंबांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती व वारसा आहे.































































