बॉक्साईट उत्खनन केलेल्या जमिनीतील खड्डे बुजवणार कधी ? ग्रामस्थांचा संतप्त सवाल

दापोली तालूक्यातील उंबरशेत तसेच रोवले या महसूली गावाच्या हद्दीत बॉक्साईट उत्खननाचे काम सन 2005 मध्ये सुरू झाले मात्र पर्यावरणाचा ऱ्हास होणाऱ्या या उद्योगामुळे उंबरशेत रोवलेचा परिसर पुर्णपणे भकास झाला आहे. बॉक्ससाईट खनिज मिळवण्यासाठी खोल उत्खननाची परवानगी नसतानाही जमिनीत 20 ते 25 फुटापर्यंत खोलवर जावून करण्यात आलेली खोदाई खनिज काढले. मात्र त्यानंतर पुन्हा खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हे खड्डे आता येथील रहीवाशांना धोक्याचे झाले आहेत.

रोवले आणि उंबरशेत या महसुली गावातील अगदी निवासी रहीवाशाच्या भागातील हद्दीत बॉक्साईट खनीज उत्खनन करण्यात आले. उत्खननामुळे पूर्वी घनदाट असलेले जंगल पूर्णपणे नष्ट झाले. डोंगर उघडे बोडके झाले. प्राण्यांच्या अधिवासाचा प्रश्न गंभीर बनला. बॉक्साईट खनिज उत्खनन करणा-या कंपनीला खनीकर्म विभागाकडून दिलेल्या शर्ती आणि अटींचा भंग झाला. खनीकर्म विभागाने खोदाईची घालून दिलेली मर्यादा उत्खनन करणारे पाळत नसल्याने येथील पाण्याची पातळी खोल जावून येथे पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. बॉक्साईट उत्खननामुळे सर्वत्र वाहून आलेल्या खडीसदृष्य खडशामुळे शेती नापिकी बनली.

रत्नागिरी जिल्हयातील दापोली तालूक्यातील केळशी हा परिसर निसर्ग संपदेच्या संपन्नतेने नटलेला असा परिसर आहे. अशा या निसर्गरम्य सुंदर परिसरातील केळशी गावाला स्वच्छ सुंदर समुद्र किनारपट्टी लाभलेली असल्याने पर्यटकांचा या निसर्गरम्य परिसरात येण्याचा ओघ अधिक वाढला आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायातून येथे रोजगार निर्मिती होवू लागली असतानाच या परिसरातील रोवले उंबरशेत येथे बॉक्साईटच्या केल्या जाणा-या उत्खननामुळे हा परिसरात पार उध्दवस्त होत चालला होता. हे चित्र पालटण्यासाठी पर्यावरणप्रेमी आणि शेतक-यांनी एकत्र येत संघर्ष केला. तत्कालिन जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित वेळोवेळी जनसुनावण्या घेण्यात आल्या त्या जनसुनावण्यांमध्ये उत्खननामुळे होणारे तोटे निदर्शनात आणत येथील रहीवाशांनी बॉक्साईट उत्खननाला प्रखर विरोध केला. तरीसुध्दा स्थानिकांचा विरोध पायदळी तुडवत शासनकर्त्यांच्या बॉक्साईट उत्खनन करण्यात आले मात्र उत्खनन करुन खड्डे तसेच ठेवण्यात आले आहेत. या खड्डयांमध्ये तुडूंब पाणी भरले आहेत आता हेच खड्डे येथील रहीवाशांना धोक्याचे होत आहेत.