
मालवण शहरात भरवस्तीत तीन ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. शहरातील मत्स्य कार्यालय समोरील नेवगी कुटुंबीय यांचे घर, भूमिअभिलेख ऑफिस जवळील सुरेंद्र पालव यांचे घर व मेढा येथील महेश परब यांच्या बंद घराचे कुलूप फोडून चोरट्यांनी डल्ला मारला.
विशेष म्हणजे या तीनही घरातील कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी बरोबर हीच घरे लक्ष केली. या चोरीत नेवगी यांच्या घरातील दीड लाख रुपये रोख रक्कम तसेच सोन्या चांदीचे दागिने असा एकूण तीन ते चार लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. तेजस नेवगी, पालव व परब यांच्या घरातून झालेल्या चोरीबाबत तक्रार देण्याची कार्यवाही मालवण पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरा पर्यत सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पालव यांच्या घरा शेजारी रात्री कुत्रे भुंकत असल्याचा जोरजोरात आवाज येत असल्याने शेजारील कुटुंबीयांना रात्री 2 वाजता जाग आली. त्यावेळी एक अज्ञात व्यक्ती पळताना दिसून आली. असे स्थानिकांनी सांगितले. मालवण पोलीस निरीक्षण विजय यादव व पोलीस पथक शुक्रवारी सकाळी घटनास्थळी दाखल झाले. ओरोस येथून श्वान पथक, ठसे तज्ञ चोरीच्या ठिकाणी दाखल झाली. पंचनामा व अधिक तपास सुरू आहे. चोरट्यांनी नेमकी किती रक्कम दागिने यावर डल्ला मारला याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र चोरीच्या घटनेमुळे मालवण शहरात खळबळ उडाली आहे.
श्वान तीनही ठिकाणी पोहचला
चोरी झाली त्या तिन्ही ठिकाणी बंद घराचे कुलूप फोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला हे दिसून येत होते. श्वान पथक आल्यानंतर श्वान नेवगी यांच्या घरातून पाठीमागे गेला. बिल्डिंग मध्ये दोन मजल्यावर घुटमळला त्यांनंतर पालव यांच्या घरी व परब यांच्या घरी श्वान पोहचला. असे पोलिसांनी सांगितले. तर चोरीच्या ठिकाणचे ठसेही पोलिसांनी घेतले आहेत. सायंकाळी डीवायएसपी यांनीही घटनास्थळी भेट दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
चोर अनवाणी ?
पालव यांच्या घरी रात्री कुत्रे भुंकले तेव्हा शेजारील काही व्यक्ती बाहेर आले तेव्हा एक अनवाणी व्यक्ती पळून जाताना दिसली. तर पहाटे 4च्या दरम्यान बस स्थानक दिशेने एक अनवाणी व मास्क धारक व्यक्ती पाठीत सॅक व हातात पिशवी घेऊन जाताना काही भरड येथील नागरिकांना दिसून आल्याचे बोलले जात आहे. या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.



























































