खेड पोलीस वसाहतीची दुरवस्था

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । खेड

खेडच्या जनतेच्या संरक्षणासाठी रात्रं-दिवस काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची मात्र दुरावस्था झाली आहे. गळके छपरं, तुटलेले दरवाजे, तुंबलेली गटारे, साप विंचवाचा मुक्त वावर या परिस्थितीत खेड पोलीस स्थानकात काम करणारे कर्मचारी राहात आहेत.

वसाहतीच्या बाजूला वाढलेल्या गवतामध्ये साप, विंचू यासारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांचा मुक्त वावर असल्याने कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची झोप उडाली आहे. अनेक वर्षात या वसाहतीची डागडुजीचे न झाल्याने वसाहतीची अवस्था कोंडवाड्यापेक्षाही भयानक झाली आहे. खेडचे उप विभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील व पोलीस निरीक्षक सुवर्ण पत्की यांनी माध्यम प्रतिनिधींसमवेत नुकतीच या वसाहतीची पाहणी केली. पोलीस वसाहतीच्या नूतनीकरणाबाबत पालक मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे.

खेड पोलीस स्थानकात कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पोलीस स्थानकाच्या आवारातच पोलीस वसाहत आहे. गेली अनेक वर्ष या वसाहतीत पोलके कर्मचारी आपल्या कुटुंबासह राहात आहेत. मात्र अलीकडे या वसाहतीची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. गेल्या कित्येक वर्षात वसाहतीची दुरुस्तीचं केलेली नाही. घराचे छप्परही गळके असल्याने पावसाचे पाणी थेट घरात येते. यामुळे गळक्या छपराला प्लास्टिक बांधून पावसापासून वाचण्याची धडपड पोलीस कुटुंब करत आहेत. तसेच परिसरातील तुंबलेली गटारेही वेळेत साफ केली जात नसल्याने दुर्गंधी आणि डासांचा त्रासही सहन करावा लागत आहे. डासांमुळे साथीच्या रोगांनाही आमंत्रण मिळत असल्याचे बोलले जात आहे. वसाहतीतील शौचालयांचीही दुरवस्था असल्याने येथील प्रत्येकाला जगणेच मुश्किल झाले आहे.

जनतेच्या रक्षणासाठी रात्रं-दिवस कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची झालेली दुरवस्था लक्षात घेत जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी पुढाकार घेऊन पोलीस वसाहतीची डागडुजी करावी अशी मागणी होत आहे.