
नोकरीधंद्यासाठी मुंबईत आलेला चाकरमानी गणपती सणाला न चुकता गाव गाठतो. गावी जाण्यासाठी कोकण रेल्वे हा सगळय़ात परवडणारा आणि सोयीचा पर्याय असताना आरक्षण फुल्ल झाल्याची बोंब सालाबादप्रमाणेच यंदाही उठली आहे. रेल्वेच्या नियमाप्रमाणे गणपतीचे आरक्षण 120 दिवस आधी सुरू झाले आणि अवघ्या एका मिनिटात आरक्षण फुल्लही झाले. अनेकांना तिकीट खिडकीवरून ‘वेटिंग’ तिकीट घेऊन परतावे लागले तर ऑनलाइन बुकिंग करणाऱयांना ‘रिग्रेट’ मेसेज पाहावा लागला. ‘अरे बाप्पा! कुछ तो गडबड है’ म्हणत चाकरमान्यांनी या सगळय़ा प्रकारावर संशय व्यक्त केला आहे. आपल्या हक्काच्या कोकण रेल्वेत एक कन्फर्म तिकीट मिळवायला झगडावे लागत असेल तर रेल्वेला कोकणी हिसका दाखवावाच लागेल, अशी तीव्र भावना प्रवासी संघटनांमधून व्यक्त होत आहे.
कुछ तो गडबड है… रेल्वे कर्मचाऱयांचे तिकीट एजंटांशी साटेलोटे!
या मार्गावर इतक्या गाडय़ा धावत असताना दुसऱ्या मिनिटाला गाडय़ा फुल्ल होऊन रिग्रेट मेसेज कसा काय झळकू शकतो? यात नक्कीच काहीतरी गडबड आहे. एजंट आणि रेल्वेचे अधिकारी-कर्मचारी मिळून हा काळाबाजार करत आहेत. त्याची चौकशी व्हायला हवी, असे एका प्रवाशाने सांगितले.



























































