कोकणच्या मेव्याची अस्सल चव, अक्षय काकतकरची दमदार वाटचाल

>>अश्विन बापट

कोकणच्या मातीतल्या पदार्थांची चव सर्वदूर पोहोचवण्याचा चंग एका तरुणाने बांधला आणि तिथूनच नांदी झाली काकतकर ब्रँड निर्मितीची. ही कहाणी आहे अक्षय काकतकर या सावंतवाडीजवळच्या दोडामार्गमधील तरुणाची.

आपल्या प्रवासाबद्दल अक्षय म्हणाला, मी 2014 मध्ये बीएससी ऍग्री पूर्ण केले. त्यापूर्वीची तीन वर्षे म्हणजे 2012 ते 14 या काळात मी दापोलीत बीएससी करत असताना तिथे देवधर नावाचा माझा एक मित्र होता. जो मला सीनियर होता. ज्याच्या वडिलांचा कोकणातल्या उत्पादनांचा व्यवसाय होता. त्यांचा व्यवसाय अंदाजे 200 ते 250 किलोंचा होता. त्यांच्याकडे तेव्हा 40 उत्पादने होती. माझ्या डोक्यातही काहीतरी व्यवसाय करण्याचे केलेले होते. काय करायचे ते मात्र ठरलेले नव्हते. देवधर यांच्याकडे हा व्यवसाय पाहिल्यावर माझ्याही मनात याच कल्पनेचा अंकुर फुलला आणि 2014 ला

ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर व्यवसाय सुरू केला. सुरुवात कोकम सरबतापासून केली. तेव्हा माझी आई आणि एका स्त्री कामगारासोबत सुरू झालेला हा व्यवसाय आज दहा वर्षांनी सहा महिला कामगार, एक अकाऊंटंट, सीझनच्या वेळी आणखी दहा महिला कर्मचारी असा विस्तारला आहे. आजमितीला 22 उत्पादने आहेत. ज्यामध्ये सरबतांपैकी कोकम, लिंबू, आलं-लिंबू, आवळा सरबत असे वैविध्य आहे, तर लोणची हीदेखील आमची खासियत आहे. मिरची, आंबा, तसेच आवळय़ाच्या लोणच्याची उत्पादने लोकप्रिय आहेत. याशिवाय आवळा मावा, आवळा कँडी, सांडगे मिरची, कोहळय़ाचे सांडगे असेही पदार्थ आम्ही तयार करून विक्री करतो.

व्यवसायाचे आर्थिक गणित बसण्यासाठी तो वर्षातल्या 365 पैकी किमान 300 दिवस सुरू राहायला हवा. त्यादृष्टीने उत्पादनांची निवड आणि त्याचे सातत्य ठेवावे लागते, असे अक्षय म्हणाला. फणस, केळफुलाची ‘रेडी टू कूक’ भाजी सध्या खास करून शहरी भागात जिथे वेळेची कमतरता आहे, लोकांना झटपट तयार होणारा पदार्थ हवाय तिथे ‘रेडी टू कूक’ या संकल्पनेतून अक्षयने काही उत्पादने तयार केली आहेत. ज्यात कोवळा फणस, तसेच केळफुलाची भाजी या दोन उत्पादनांना चांगली मागणी आहे. भविष्यात ‘रेडी टू कूक’ अळूची भाजीदेखील बाजारात आणण्याचा त्याचा विचार आहे. माझा मित्र मयुरेश पुरोहितच्या साथीने ही रेडी टू कूकची प्रॉडक्ट रेंज वाढवण्याचा माझा मानस आहे, असे अक्षय म्हणाला.

उत्पादने सर्वदूर पोहोचवणार

आमची उत्पादने कोकणासोबतच मुंबई, पुणे, गोवा या ठिकाणी चांगली पसंती मिळवतात. काळानुसार व्यवसायवृद्धीसाठी पोस्ट खात्यासोबत आमचा करार झालाय. त्यानुसार जिथे जिथे पोस्टाची सेवा पोहोचलीय, तिथे तिथे आमची उत्पादने पोहोचू शकतात. सध्या राज्याबाहेर आम्ही गुजरात तसेच मध्य प्रदेशच्या इंदूरपर्यंत पोहोचलोय. आमच्या उत्पादनांचा आणि पर्यायाने कोकण भूमीतल्या पदार्थांची चव अवघ्या जगातील मंडळींना चाखता यावी यासाठीही भविष्यात पावले टाकण्याचे माझे स्वप्न आहे, असाही निर्धार अक्षयने बोलून दाखवला.

(लेखक एबीपी माझाचे सीनिअर प्रोडय़ूसर-सीनिअर न्यूज अँकर आहेत.)