कोकणच्या मातीत बहरला ऊसाचा मळा; चिरनेरच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

507

कोकणाला भात पिकाचे वरदान असताना उरण तालुक्यातील ऐतिहासिक चिरनेर गावातील एका प्रगतशील शेतकऱ्याने आपल्या शेतीत ऊसाचे विक्रमी पीक घेऊन नवा यशस्वी प्रयोग केला आहे. या शेतकऱ्याने ऊस शेतीतून वर्षाकाठी आठ लाखांचे उत्पन्न घेतले आहे.

कोकणातील रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे.भात पिकाशिवाय रब्बी हंगामात वाल, चवळी यांसारखी नगदी कडधान्य पिकं घेणाऱ्या इथल्या शेतकऱ्यांनी काही प्रमाणात आंबा,नारळाच्या बागायती निर्माण केल्या.मात्र निसर्ग लहरीवर अवलंबून असणाऱ्या या पिकांमधून रायगडच्या शेतकऱ्याला कधी फायदा मिळाला नाही. त्यामुळे येथील शेतकरी कुटुंबांची नेहमीच आर्थिक ओढाताण होत असते. ही आजचीही वस्तुस्थिती आहे. मात्र आपल्या शेतीत काहीतरी वेगळा प्रयोग करायचा या विचाराने भारावलेले चिरनेर येथिल प्रगतशील शेतकरी किसन गोंधळी यांनी दहा वर्षांपूर्वी आपल्या दोन एकर शेतीमध्ये ऊसाची लागवड केली.कोकणात आणि ऊसाची शेती…ही कल्पना काही शेतकऱ्यांना पटली नसल्याने त्यांनी किसन गोंधळी यांना मूर्खात काढले. मात्र शेतीत नेहमी विविध प्रयोग करणाऱ्या गोंधळी यांचा आपल्या ऊस शेतीवर पूर्ण भरोसा होता. त्यांनी शेतात लावलेल्या ऊसाला पूर्णपणे सेंद्रिय खते देऊन वाढविले. एका वर्षात ऊस जोमदार झाला. घाटमाथ्यावरील ऊसापेक्षा या ऊसाची उंची व चव उच्च प्रतीची असल्याचे दिसून आले.

ऊसाचे पीक जोरदार आले, मात्र ऊस विकायचा कुठे या प्रश्नाने किसन गोंधळी यांना ग्रासले. त्यावरही त्यांनी उपाय शोधला आणि आपल्या घराजवळच स्वतःचे रसवंती गृह सुरू केले. अत्यंत रुचकर व सेंद्रिय खताच्या ऊस रसाला मागणी वाढू लागल्याने गोंधळी कुटुंबाने हा व्यवसाय कायमस्वरूपी सुरू केला. काही वर्षांपूर्वी किसन गोंधळी या प्रगतीशील शेतकऱ्याचे निधन झाले. मात्र त्याची दोन मुले संदीप नि संग्राम यांनी ऊस शेतीचा वारसा आजही सुरु ठेवला आहे. यावर्षी त्यांनी सुमारे दीड एकर शेतीत ऊस लागवड केली आहे.त्यांच्या ऊस रसाच्या व्यवसायाला शेतातील ऊस पुरेसा होतो. या व्यवसायातून त्यांना वर्षाकाठी किमान आठ लाखांचे उत्पन्न मिळते आणि त्यावरच त्यांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सांभाळली आहे.

चिरनेरच्या गोंधळी कुटुंबाने आपल्या शेतीमध्ये केलेली ऊसाची शेती ही नव्या पिढीसाठी आदर्शवत आहे. भातशेतीत खर्च जास्त आणि उत्पन्न कमी येत असल्याने जर शेतकऱ्यांनी गोंधळी कुटुंबाने केलेल्या ऊस शेतीसारखे प्रयोग केले तर शेतीउद्योग नक्की फायद्यात येईल – अविनाश म्हात्रे, माजी सरपंच चिरनेर

आपली प्रतिक्रिया द्या